शिर्डी अपघात प्रकरण, पाळणा चालक आणि मालकावर पोलिसांत गुन्हा दाखल
शिर्डीत रामनवमी निमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवानिमित्त साईसंस्थान प्रसादालयासमोर यात्रा भरली होती. या यात्रेत दुर्घटना घडल्याने उत्सवाला गालबोट लागले आहे.
शिर्डी / मनोज गाडेकर : साईसंस्थानच्या प्रसादालयासमोरील लावण्यात आलेल्या पाळण्याचा ट्रॉलीचा एक पाळणा अचानक तुटला. खाली पाळण्यात बसण्यासाठी उभे असलेल्या नागरिकांवर हा तुटलेला पाळणा पडला. या अपघातात चार जण जखमी झाले. दुर्घटनेत ज्योती किशोर साळवे, किशोर पोपट साळवे यांच्या पायांना मोठी गंभीर दुखापत झाली. याशिवाय 14 वर्षाच्या मुलीच्या डोक्याला जखम झाली तसेच प्रविण अल्हाट हा तरुणही जखमी झाला होता. आता या प्रकरणी पाळणा चालक आणि मालक यांच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे रामनवमी उत्सवाला गालबोट लागलंय.
जागा मालक आणि पाळणा चालकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल
रामनवमी उत्सवातील यात्रेत पाळण्याचा अपघात घडल्याने चार जण जख्मी झाले होते. या प्रकरणी पाळणा चालक आणि मालकावर शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पाळणा चालवण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. याप्रकरणी जागा मालक शिवाजी भोसले, पाळण्याचा चालक हसन सय्यदसह जागा मालक रमेश गोंदकर, किशोर गोंदकर, विजय गोंदकर यांच्यावर भादवि कलम 279, 336, 337, 338 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत चार जण जखमी झाले असून एकाची प्रकृती अद्यापही चिंताजनक असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रुग्णांवर मोफत उपचार करण्याच्या सूचना
जखमींना तातडीने संस्थानच्या साईबाबा रूग्णालयात हलवण्यात आले. रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक, उपसंचालक डॉ. प्रितम वडगावे तातडीने अपघात कक्षात दाखल केले. त्यांनी रूग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. शिर्डीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी आणि नंतर रूग्णालयात धाव घेतली.