Buldhana Crime : माजी उपनगराध्यक्ष कुणाल बोंद्रेसह चौघांवर गुन्हे दाखल, भूखंड फसवणूक प्रकरणी कारवाई
जागेच्या मूळ मालकांनी अनेकांना चिखली येथील सर्व्हे नंबर 103/5 मधील प्लॉट अकृषक असल्याचे सांगत, जास्त पैसे घेऊन विक्री केली. कुणाल बोंद्रे या मूळ मालकांनी प्लॉट आम्हाला विक्री केलेला असताना गहाण खत तयार करून, त्यावर दोन कोटी रुपये कर्जाची उचल केलीय.
बुलढाणा : चिखली नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे (Priya Bondre) यांचे पती तथा माजी उपनगराध्यक्ष कुणाल बोंद्रे (Kunal Bondre), सासऱ्यांसह दोन चुलत सासरे यांच्याविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात फसवणुकी (Fraud)चे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या चारही आरोपींच्या नावावर असलेला चिखली येथील भूखंडाची विक्री नागरिकांना 25 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. असे असतानाही ती जागा बँकेकडे गहाण देऊन त्यावर सुमारे दोन कोटींचे कर्ज घेत, प्लॉट खरेदी करणाऱ्यांची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसात दिली होती. विजय वाळेकर यांनी चिखली पोलिसात याबाबत दिली होती. या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी कुणाल बोंद्रे, त्यांचे वडील आणि दोन काका अशा चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
विक्री केलेल्या प्लॉटवर फसवणूक करत कर्ज घेतले
जागेच्या मूळ मालकांनी अनेकांना चिखली येथील सर्व्हे नंबर 103/5 मधील प्लॉट अकृषक असल्याचे सांगत, जास्त पैसे घेऊन विक्री केली. कुणाल बोंद्रे या मूळ मालकांनी प्लॉट आम्हाला विक्री केलेला असताना गहाण खत तयार करून, त्यावर दोन कोटी रुपये कर्जाची उचल केलीय. शिवाय ज्या नागरिकांनी त्यांच्या जवळून प्लॉट विकत घेतले होते, त्यांच्या नावाने खरेदी तर झालीय, मात्र सातबारा त्यांच्या नावावर नव्हता. मूळ मालक असलेल्या या चार आरोपींच्या नावावर अद्यापही सातबारा कायम आहे. तर प्लॉट धारकांनी बोंद्रे कुटुंबाला अनेक वेळा प्लॉट नावावर करून देण्यास सांगितले, मात्र त्यांनी आतापर्यंत उडवा उडवीची उत्तरे दिली.
महसूल विभागाही त्यांच्याकडे दिलेले आकृषक आदेश हे बनावट असल्याचे सांगत असून त्याची नोंद करता येत नाहीये. त्यामुळे प्लॉट धारकांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. शिवाय त्यावर मूळ मालक यांनी कर्जही काढले. परस्पर झालेल्या या व्यवहारामुळे फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी सुरेश आप्पा बोंद्रे, सुभाष आप्पा बोंद्रे, काशिनाथ आप्पा बोंद्रे आणि कुणाल बोंद्रे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Four persons, including former deputy mayor Kunal Bondre, have been booked in a land fraud case)