मित्राच्या वाढदिवसानिमित्त फिरायला आले अन् धबधब्यात बुडाले, चार मित्रांचा करुण अंत
मयत आकाश झिंगा याचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त मयत चौघे आणि बचावलेला तरुण प्रतीक हाटे असे पाच मित्र मिळून अंबरनाथमधील कोंडेश्वर धबधब्यावर फिरायला गेले होते.
बदलापूर : मित्राच्या वाढदिवसानिमित्त कोंडेश्वर धबधब्यावर फिरण्यासाठी आलेले चार तरुण (Four Youth) धबधब्यात बुडाल्याची (Drowned in Kondeshwar Waterfall) धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडली आहे. चौघेही मुंबईतील घाटकोपर परिसरातील रहिवासी आहेत. चौघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी कुळगाव पोलीस ठाण्यात (Kulgaon Police Station) अपघाची मृत्यू नोंद करण्यात आली आहे.
स्वयंम बाबा मांजरेकर, आकाश राजू झिंगा, सूरज मच्छिंद्र साळवे, लिनस भास्कर उच्चपवार अशी मयत तरुणांची नावे आहेत. सर्व तरुण घाटकोपर पूर्वेतील कामराज नगर येथील रहिवासी आहेत. चौघेही विद्यार्थी आहेत.
मित्राच्या वाढदिवसानिमित्त फिरायला गेले होते धबधब्यावर
मयत आकाश झिंगा याचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त मयत चौघे आणि बचावलेला तरुण प्रतीक हाटे असे पाच मित्र मिळून अंबरनाथमधील कोंडेश्वर धबधब्यावर फिरायला गेले होते.
यावेळी स्वयंम, आकाश, सूरज आणि लिनस हे चौघे पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने चौघे बुडू लागले. यावेळी प्रतीकने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला.
स्थानिक नागरिकांनी धाव घेत मृतदेह बाहेर काढले
यानंतर प्रतीकने आरडाओरडा केल्याने स्थानिक नागरिक गोळा झाले. नागरिकांनी चौघांना पाण्यातून बाहेर काढले. याबाबत कुळगाव पोलिसांना याची माहिती देण्यात आली. चौघांचे मृतदेह बदलापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.