शेअर बाजारात नफ्याचे आमिष दाखवून गंडा, फसवणूक करत पती-पत्नीने लाखो रुपये लुबाडले !
हरीश कोलार आणि त्यांच्या पत्नीची फेब्रुवारी 2018 मध्ये दीपक कुराणी आणि हिना कुराणी यांच्याशी भेट झाली होती. यावेळी शेअर मार्केट आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास तिप्पट नफा मिळेल, असे आमिष कुराणी दाम्पत्याने कोलार दाम्पत्याला दाखवले.
नागपूर / सुनील ढगे (प्रतिनिधी) : शेअर बाजारात तिप्पट नफ्याचे आमिष दाखवत पाच जणांना 65 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पती-पत्नी विरोधात प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपी पतीचे दीड वर्षापूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे पत्नीच्या चौकशीवरच पोलिसांचा भर राहणार आहे. पैसे गुंतवणूक करुन एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी नफाही मिळाला नाही आणि पैसेही परत दिले नाहीत. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.
2018 मध्ये फिर्यादींची आरोपींशी ओळख झाली
हरीश कोलार आणि त्यांच्या पत्नीची फेब्रुवारी 2018 मध्ये दीपक कुराणी आणि हिना कुराणी यांच्याशी भेट झाली होती. यावेळी शेअर मार्केट आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास तिप्पट नफा मिळेल, असे आमिष कुराणी दाम्पत्याने कोलार दाम्पत्याला दाखवले. कुराणी दाम्पत्यावर विश्वास ठेवून कोलार दाम्पत्याने त्यांच्याकडे 41 लाख गुंतवले.
शेअर मार्केटमध्ये तिप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले
यानंतर कोलार यांनी आपल्या चार मित्रांना या स्कीमबद्दल माहिती दिली. त्यांच्यासोबत त्यांच्या चार मित्रांनी कुराणी दाम्पत्याकडे गुंतवणूक केली. 26 फेब्रुवारी 2018 ते 12 ऑक्टोबर 2021 दरम्यान पाच जणांनी कुराणी दाम्पत्याकडे तब्बल 65 लाख रुपये दिले. मात्र कुराणी दाम्पत्याने गुंतवणूकदारांना कुठलाही नफा दिला नाही आणि पैसे देखील परत केले नाहीत. याबाबत तक्रारदारांकडून वारंवार विचारणा करण्यात आली.
पैसे परत करण्यास टाळाटाळ करु लागल्याने फसवणूक उघड
कुराणी दाम्पत्य काही ना काही कारण सांगून टाळाटाळ करत होते. यानंतर 1 डिसेंबर 2021 रोजी दीपक कुराणी याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. अखेर कोलार यांनी नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे धाव घेतली. आर्थिक गुन्हे शाखेच्या प्राथमिक चौकशीनंतर प्रताप नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.