अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवत फसवणूक, बांधकाम व्यावसायिकासह महिलेला लाखोंचा गंडा
अधिक व्याजाचे आमिष दाखवत ग्राहकांना लुटल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत.
डोंबिवली : अधिक व्याज मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका जोडप्याने लाखोंची फसवणूक केल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली एका बांधकाम व्यावसायिकासह एका महिलेची तब्बल 30 लाखाची फसवणूक या जोडप्याने केली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात जोडप्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशांत विश्वास भोईर आणि पूजा विशांत भोईर अशी आरोपी जोडप्याची नावे आहेत. याप्रकरणी खडकपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.
काय आहे प्रकरण?
आरोपी जोडप्याची मे. साई ॲडव्हायझरी ॲन्ड इन्व्हेस्टमेंट नावाची कंपनी आहे. आरोपींनी आपण शेअर व्यवसायात काम करतो असे सांगत गुंतवणुकीवर 10 टक्के परताव्याचे आमिष दाखवले. वाढीव नफ्याच्या हव्यासापोटी बांधकाम व्यावसायिक सौरभ गणात्रा यांनी 25 लाख रुपये गुंतवले. तर अशाच आमिषाला बळी पडून यशश्री साळुंखे या महिलेने 5 लाख रुपये आरोपींच्या मे. साई ॲडव्हायझरी ॲन्ड इन्व्हेस्टमेंट या कंपनीत गुंतवले होते.
पोलिसांकडून अधिक तपास सुरु
वर्ष उलटून गेले तरी व्याजाचे पैसे न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी आपले गुंतवलेले पैसे परत करण्याची मागणी आरोपींकडे केली. मात्र ते पैसे परत करण्यास भोईर जोडपे टाळाटाळ करु लागले. यावरुन आपली फसवणूक झाल्याचे गणात्रा यांच्या लक्षात आले. यानंतर गणात्रा यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. खडकपाडा पोलीस प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.