चार कोटीसाठी मित्राला संपवले, मग स्वतःच्या मृत्यूचा बनाव केला, पण…

| Updated on: Jun 29, 2023 | 12:02 PM

बिझनेसमध्ये मोठे नुकसान झाले होते. यामुळे तो आर्थिक विवंचनेत होता. मग आर्थिक समस्या दूर करण्यासाठी त्याला एक कल्पना सुचली, पण यानंतर त्याची थेट तुरुंगात रवानगी झाली.

चार कोटीसाठी मित्राला संपवले, मग स्वतःच्या मृत्यूचा बनाव केला, पण...
विम्याच्या पैशासाठी मित्राने मित्राला संपवले
Follow us on

फतेहगढ : पंजाबमध्ये मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. पैशासाठी मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अपघाती विम्याचे पैसे मिळवण्यासाठी आरोपीने पती आणि अन्य चौघांसोबत मिळून आपल्या मृत्यूचा बनाव रचला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी गुरप्रीत सिंह, त्याची पत्नी खुशदीप कौर आणि अन्य चौघांना अटक केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मयताच्या पत्नीने पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवली. यानंतर सर्व घटना उघडकीस आली.

बिझनेसमध्ये मोठे नुकसान झाले होते

गुरप्रीत सिंह एक बिझनेसमन होता. त्याला बिझनेसमध्ये मोठे नुकसान झाले होते. गुरप्रीतने स्वतःचा 4 कोटी रुपयांचा अपघाती विमा काढला होता. बिझनेसमध्ये नुकसान झाल्याने त्याला पैशांची खूप गरज होती. यासाठी विम्याचे पैसे मिळवण्यासाठी त्याने पत्नी आणि अन्य चौघांसोबत मिळून प्लान केला. स्वतःसारखा दिसणाऱ्या व्यक्तीची हत्या करुन आपल्या हत्येचा बनाव करुन विम्याचे पैसे मिळवण्याचा गुरप्रीतने प्लान केला. त्यासाठी त्याने आपल्यासारखा दिसणारा सुखजीत सिंह याच्याशी मैत्री केली. मग अनेक दिवसांपासून तो त्याला दारु आणि पैसे देत होता.

‘अशी’ केली हत्या

अखेर 19 जूनला आपला कट यशस्वी करण्याची योजना आखत गुरप्रीतने नशेचं औषध टाकून सुखजीतला भरपूर दारु पाजली. दारु प्यायलानंतर सुखजीत बेशुद्ध झाला. मग आरोपी त्याला राजपुरा येथे घेऊन गेले आणि तेथे ट्रकखाली त्याला चिरडले. यानतर गुरप्रीतने स्वतःच्या अपघाती मृत्यूचा बनाव केला. त्यानुसार त्याच्या घरच्यांनी पोलिसात नोंद केली.

हे सुद्धा वाचा

‘असा’ उघड झाला गुन्हा

सुखजीत घरी परतला नाही म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास सुरु केला असता त्यांना सुखजीतची चप्पल आणि बाईक पटियाला रोडवर नाल्याजवळ सापडली. तेथून एक किमी अंतरावर सुखजीतचा मोबाईल जमिनीत गाढलेला आढळला. सुखजीतसोबत काहीतरी चुकीचं घडल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी सखोल तपास सुरु केला असता त्यांना सुखजीत आणि गुरप्रीतच्या मैत्रीबाबत कळले. तसेच 19 तारखेला दोघांना एकत्र पाहिल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली. मात्र दुसऱ्या दिवशी गुरप्रीतचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद राजपुरा ठाण्यात करण्यात आली होती.

राजपुरा पोलिसांना मिळालेला मृतदेह आपल्या पतीचा असल्याचे सांगत गुरप्रीच्या पत्नीने त्याच्यावर अंत्यसंस्कारही केले. मात्र पोलीस तपासात पोलिसांना गुरप्रीत जिवंत असल्याचे कळले. यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास ह्युमन इंटेलिजन्स आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने सर्व प्रकरणाची सत्यता पडताळली. गुरप्रीतची सर्व माहिती गोळा केली. यानंतर सर्व सत्य उजेडात आले. पोलिसांनी गुरप्रीत सिंह, त्याची पत्नी आणि अन्य चौघांना अटक केली आहे.