दोन महिन्यापासून पोलिसांना चकवा देत होता, ती एक चूक नडली आणि सापडला पोलिसांच्या कचाट्यात, गावठी पिस्तूलही…
नाशिकच्या इंदिरानगर परिसरात झालेल्या हवेत गोळीबार प्रकरणातील आरोपी गजाआड करण्यात आला आहे. मुंबई नाका पोलिसांनी ही कारवाई केली असून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
नाशिक : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकच्या इंदिरानगर परिसरात हवेत गोळीबार ( Nashik Gunfire ) केल्याची घटना घडली होती. वापरण्यासाठी दिलेली कार परत द्यायला गेलल्या मित्रावरच गावठी पिस्तूल रोखले होते. मात्र सुदैवाने मित्र थोडक्यात बचावल्याने त्याने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे मुंबई नाका पोलिसांनी ( Nashik Police ) घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला होता. त्यानंतर यातील मुख्य संशयित आरोपी गेल्या दोन महिन्यांपासून फरार होता. त्याला नुकताच मुंबई नाका पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.
इंदिरा नगर बोगद्याजवळ हवेत गोळीबार करणारा सुनील देविदास चोरमारे याला अटक करण्यात आली आहे. याशिवाय त्याच्याकडून गावठी पिस्तूलही जप्त करण्यात आले असून पुढील तपास केला जात आहे.
इंदिरानगर परिसरात 4 जानेवारीला मध्यरात्री अविनाश टिळे हा संशयित आरोपी चोरमारे यांची वापरण्यासाठी आणलेली गाडी परत द्यायला गेला होता. त्याच वेळी बोगद्याजवळ येताच चोरमारे याने कमरेला असलेले गावठी पिस्तूल बाहेर काढले.
सुरुवातीला काही बनाव करतोय म्हणून अविनाश टिळे यांना काही विशेष वाटले नाही. पण त्यानंतर हवेत गोळीबार केला त्यावेळी फायर झाल्याने टिळे घाबरला. चोरमारे याने हा गोळीबार केला होता. त्याच वेळी सोबत असलेल्या तरुणांनी धमकी दिली होती.
तुला जीवंत सोडत नाही म्हणत जग्गू सांगळे, राज जोशी यांनी धमकी दिली होती. हे दोघेही यापूर्वीच पोलिसांच्या हाती लागले होते. याच दरम्यान चोरमारे याने दुसऱ्यांदा फायर केले तेव्हा विशेष म्हणजे पिस्तुलातून गोळी बाहेर आली नाही. त्यामुळे टिळे हा थोडक्यात वाचला होता.
टिळे याने लागलीच मुंबई नाका पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार मुंबई नका पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला होता. सहाय्यक निरीक्षक साजिद मन्सूरी यांनी याबाबत तपास करत ही कारवाई केली आहे.
गोपनीय माहीतीच्या आधारे मुख्य संशयित आरोपी हॉटेल एम्पायरजवळ येणार असल्याची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी सापळा रचला होता. त्यात संशयित आरोपी चोरमारे अडकला आणि पोलिसांच्या कारवाईला यश आले आहे.