पहाटे जाग आली अन् पोटची लेक जमिनीवर कोसळल्याचे पाहून वडीलांची दातखीळ बसली; युवती सेनेच्या शहर प्रमुखाच्या हत्येने खळबळ
युवती सेनेच्या शहर प्रमुख महिलेच्या झालेल्या हत्येमुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. मात्र ही हत्या कोणी केली, त्याचं नाव समोर आल्यावर तर पोलिसही हादरले आहेत.
गडचिरोली | 15 सप्टेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या शहर प्रमुख असलेल्या महिलेच्या हत्येमुळे (crime news) संपूर्ण शहर हादरलं. राहत सय्यद असे मृत महिलेचे नाव असून तिची चाकूने भोसकून हत्या (murder news) करण्यात आली. धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या मारेकऱ्याने स्वत: पोलिसांत जाऊन गुन्ह्याची कबुली दिल्याने पोलिसही हादरले. तिचा मारेकरी कोण हे कळल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला. राहत हिची हत्या इतर कोणी नव्हे तर तिच्या जन्मभराच्या जोडीदारानेच, अर्थात तिच्या पतीनेच तिची हत्या केल्याचे उघड झाले अन् पोलिसही चक्रावले. ताहेमीम शेख असे आरोपीचे नाव आहे. कुरखेडा शहरात हत्येचा हा थरारक प्रसंग घडला असून त्यांमुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. लेकीच्या मृत्यूमुळे कुटुंबिय शोकाकुल झाले आहेत. मात्र आरोपीने ही हत्या नेमकी का केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरखेडा येथे राहणारी राहत सय्यद ही मृत महिला, शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख होती. मधरात्री दीड वाजताच्या सुमारास ही हत्या घडल्याचे समजते. राहत ही घरात झोपली होती, तेव्हाच तिचा पती ताहेमीम याने तिची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर तो थेट नदीवर गेला आणि तेथे अंघोळ केली. त्याच्या कपड्यांवरही विविध ठिकाणी रक्ताचे डाग पडले होते. त्याने कपडे स्वच्छ धुतले आणि तेथून त्याने सरळ पोलीस स्थानक गाठले.
तेथे जाऊन आरोपी ताहेमीम याने घडलेला सर्व प्रकार सांगत आपणच पत्नीची हत्या केल्याचे कबूल केले. हे ऐकून समोर असलेले पोलिस अधिकारी देखील हादरले. तर दुसरीकडे घरात, पहाटेच्या सुमारास राहत हिच्या वडिलांना जाग आली. मात्र समोरील दृश्य पाहून ते मटकन खाली बसले. त्यांच्या काळजाचा तुकडा असणारी, त्यांची लेक, राहत ही जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर तिच्या वडिलांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांच्या आरड्या-ओरड्याने घरात आणि आजूबाजूच्या लोकांना, शेजाऱ्यांना जाग आली व तेघरात धावत आले. तेथील दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.
का केली पत्नीची हत्या ?
दरम्यान आरोपी ताहेमीम याच्या कबुलीनंतर पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली. नंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व गोष्टींची पाहणी करत तपास सुरू केला. राहत हिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपी ताहेमीम याला काही दिवसांपूर्वीच छत्तीसगडमधील रायपूर येथे हरणाची शिंगे विक्री करण्याच्या प्रकरणात अटक झाली होती. १५ दिवसांपूर्वीची त्याची जामिनावर सुटका झाली होती व तो तुरूंगातून बाहेर आला. राहत हिच्याशी लग्न करण्यापूर्वी आरोपी हा मुंबईत फुटपाथवर साहित्य विक्रीचे काम करायचा असे समजते. लग्नानंतर आरोपी व राहत हे दोघेही, तिच्या माहेरीच पालकांसोबत रहात होते. आरोपीने ही हत्या नेमकी का केली, त्यामागचे कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस याप्रकरणी कसून तपास करत असून आरोपीचीही चौकशी करण्यात येत आहे.