भाईंदर : लांब प्रवासाच्या भाड्याचे आमिष दाखवून रिक्षाचालकाला प्रवासात गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या टोळीचा मीरा रोड परिसरात पर्दाफाश झाला आहे. मीरा रोड येथे एका 50 वर्षीय ऑटो-रिक्षाचालकाला गुंगीचे औषध असलेले कोल्ड्रिंक्स देऊन त्याची 50 हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेण्यात आली होती. प्रवासी असल्याचे भासवून आधी रिक्षात बसले, मग हा सर्व लुटीचा प्रकार घडवला होता. या प्रकरणी मीरा भाईंदर-वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेने तीन चोरट्यांना शुक्रवारी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. आरोपींनी आतापर्यंत किती लोकांची अशा प्रकारे फसवणूक केली, याचा पोलीस तपास करत आहेत. सागर महेंद्र पारेख, समपतराज गेवरचंद जैन उर्फ सॅम्पो आणि सुभाष अरविंद पाटील अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे तिघेही गुजरातमधील सुरत आणि अहमदाबादचे रहिवासी आहेत.
ही टोळी मुंबई, पुणे आणि ठाणे या शहरांत कार्यरत असून, ऑटो-रिक्षा भाड्याने घेऊन ऑटोचालकांना लुटण्याची त्यांची मोडस ऑपरेंडी होती. ही टोळी रिक्षाचालकांना परतीच्या प्रवासाची खात्री देऊन लांब अंतरासाठी रिक्षा भाड्याने न्यायचे, असे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. लुटारु रिक्षा भाड्याने घेतल्यानंतर चालकाशी मैत्री करायचे आणि संबंधित चालकाला गुंगीचे औषध असलेले थंड पेय द्यायचे. ते थंड पेय पिण्यास चालकाला भाग पाडत असायचे.
पेय प्यायल्यानंतर काही मिनिटांनी रिक्षाचालकाला धुंदी आली की, त्या चालकाकडील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन पळून जायचे. मिरा रोड येथील रिक्षाचालकाला देखील असाच अनुभव आला होता. त्याच अनुषंगाने लुटारुंच्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या हेतूने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि लुटारुंना पकडले.
पोलिस निरीक्षक अविराज कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनानुसार एपीआय पुष्पराज सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखेच्या युनिटने घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याचबरोबर संभाव्य सुटकेच्या मार्गांची तपासणी केली. तसेच खबऱ्यांचे नेटवर्क सक्रिय केले. त्याआधारे संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची ओळख पटवली.
पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्यामागील धक्कादायक मोडस ऑपरेंडी उघड झाली. आरोपींनी आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. अधिक चौकशीनंतर त्यांनी याआधी केलेल्या अशाच आठ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. अशा प्रकारच्या आणखी गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. स्थानिक न्यायालयाने आरोपींची कोठडीत रवानगी केली असून, याप्रकरणी काशिमीरा पोलीस अधिक तपास करत आहेत.