विरार : सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने जाऊन हातचलाखी करत दुकानातील सोने चोरणाऱ्या टोळीचा विरारमध्ये भांडाफोड करण्यात आला आहे. या टोळीत एकूण 5 जणांचा समावेश असून सध्या एक महिला आणि एका पुरुष अशी दोन चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 6 लाख 88 हजार 960 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना अटक करून, तीन दिवसांच्या पोलीस कास्टडीत पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी विरार, वालीव, अर्नाळा, पालघर, डहाणू या पोलीस ठाण्यातील 6 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. अटक आरोपींवर भादवी कलम 380, 34 प्रमाणे विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना वसई न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार असून, दुसऱ्या गुन्ह्यात वालीव किंवा अर्नाळा पोलीस या आरोपींचा ताबा घेऊ शकतात अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे.
बाळकृष्ण ज्ञानेश्वर गायकवाड (वय 45), आणि ज्योती जसवंत सोळंकी ( वय 32) असे अटक चोरट्या ची नाव असून हे अंबरनाथ चे राहणारे आहेत. यांची 5 जणांची टोळी असून या टोळीत 3 महिलांचा समावेश आहे. हे सर्वजण सराईत चोरटे आहेत. या टोळीने 1 जून रोजी विरार पूर्व वैभव ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने येऊन, ज्वेलर्स मालकाला बोलण्यात गुंतवून, हातचलखीने सोने चोरी करून फरार झाल्या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
अशाच प्रकारची गुन्हे वारंवार घडत असल्याने विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी वरिष्ठ च्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप राख, पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हावलदार सचिन लोखंडे, संदीप जाधव, इंद्रनील पाटील, विशाल लोहार, संदीप शेरमाळे, योगेश नागरे, पोलीस अंमलदार सचिन बलीद, बालाजी गायकवाड, मोहसीन दिवाण, दत्तात्रय जाधव, प्रफुल सोनार, यांचे स्वतंत्र पथक बनवून तपास सुरू केला होता.
ज्या परिसरात अशी गुन्हे घडली आहेत त्या सर्व ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज मिळवून यातील बाळकृष्ण गायकवाड या आरोपीला अटक करून त्याची चौकशी केली असता सर्व गुन्ह्याचा उकल झाला आहे. हे आरोपी सराईत असून यांनी मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, गुजरात, या परिसरातील अनेक पोलीस ठाणे हद्दीत अशाच प्रकारचे गुन्हे केले असून, तेही उघड होतील असे तापासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे यांनी सांगितले आहे.