माणुसकीला काळिमा फासणारी घटना, जखमी अवस्थेत चिमुकली मागत होती मदत, लोकं व्हिडीओ बनविण्यात गुंग
उत्तरप्रदेशच्या पिलिभीत येथे एक लहान मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यूशी झुंज देत होती आणि उपस्थित लोकं तिचा व्हिडीओ शूट करत होते.
पिलिभीत, उत्तर प्रदेशातील माधौपूर गावात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एक लहान मुलगी रक्ताने माखलेली अवस्थेत मृत्यूशी झुंज देत असताना तिला रुग्णालयात नेण्याऐवजी लोकं तिचा व्हिडीओ बनवत होते. तब्बल अर्धा तास ही मुलगी तडफडत होती मात्र लोकांना तिची तसूभरही दया आली नाही. अखेर त्या चिमुकलीचा तडफडून मृत्यू झाला. (Girl brutalised left) माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना उत्तरप्रदेशच्या अमरिया पोलीस स्टेशन हद्दीतील माधौपूर गावातील आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून मृताच्या नातेवाईकांची चौकशी सुरू आहे.
वैमनस्यातून हत्त्या झाल्याचा संशय
मुलीची हत्त्या झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृत मुलीचे काका सलीम यांनी आरोप केला आहे की, मुलगी काल संध्याकाळी गावात होणाऱ्या उर्ससाठी तिच्या मामासोबत गेली होती, रात्री उशिरापर्यंत ती परत न आल्याने त्यांनी तिचा शोध सुरू केला, त्यानंतर ती शेतात रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. लोकांना ज्यावेळेस ती दिसली तेव्हा ती जिवंत होती, मात्र माणुसकी हरविलेल्या लोकांनी तिचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्त्न करण्याऐवजी व्हिडीओ बनविण्यात गुंग झाले. जवळपास अर्धा तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ती चिमुकली गतप्राण झाली. दुसरीकडे, या घटनेबाबत पोलीस अधीक्षक दिनेश कुमार पी यांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीचा मृतदेह शेतातून सापडला आहे. मुलीच्या पोटात जखमेच्या खुणा आढळल्या आहेत. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी आल्यानंतर तपास करत आहे. वैमनस्यातून मुलीची हत्या झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, सध्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यात येत असून पोलीस प्रत्येक पैलू बारकाईने तपासात आहेत.