अल्पवयीन विद्यार्थिनीने रचला स्वत:च्याच अपहरणाचा बनाव, कारण ऐकून व्हाल हैराण

| Updated on: May 15, 2023 | 1:54 PM

एका अल्पवयीन मुलीने तिला स्वत:लाच पळवून नेण्याचा खोटा प्लॅन रचल्याचे पोलिस तपासात उघड झाले.

अल्पवयीन विद्यार्थिनीने रचला स्वत:च्याच अपहरणाचा बनाव, कारण ऐकून व्हाल हैराण
Follow us on

Crime News : मध्य प्रदेशातील इंदौर येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती तिच्या वडिलांना मिळताच त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तिचा चौफेर शोध सुरू केला. विद्यार्थिनीचा शोध घेतल्यानंतर अल्पवयीन मुलीनेच स्वत:च्या अपहरणाचा खोटा प्लॅन रचल्याचे निष्पन्न झाले. मुलीच्या हातात महाकाल मंदिराचा धागा बांधलेला पाहून पोलिसांना संशय आला आणि चौकशीत अल्पवयीन मुलीने संपूर्ण सत्य उघड केले. त्यामागचे कारण जाणून तर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. वडिलांनी पोलिसांना सांगितले की, अल्पवयीन मुलगी कोचिंग क्लासला गेली होती, त्यानंतर ती घरी परतली नाही. त्यांनी शेजारच्या परिसरात शोध घेतला आणि तिच्या मैत्रिणींनाही फोन केला, मात्र ती सापडली नाही. पोलिसांनी तक्रार नोंदवून अल्पवयीन मुलीचा शोध सुरू केला. जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले. मात्र तरीही तिचा शोध लागला नाही. दुसऱ्या दिवशी अल्पवयीन मुलीने तिच्या वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली आणि तिला वाचवण्यास सांगितले.

ही होती अपहरणाची खरी घटना

अल्पवयीन मुलीने फोन करून वडिलांना आपल्या अपहरणाची माहिती दिली असता वडिलांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी कॉल ट्रेस करून तरुणीचा शोध घेतला. पोलिसांनी तातडीने धरमपूर गाठून मुलीला आपल्या संरक्षणात घेतले. अल्पवयीन विद्यार्थिनीला पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली असता, रिक्षाचालकानेच तिचे अपहरण केल्याचे तिने सांगितले. शुद्धीवर आल्यावर आपण शेतात असल्याचे तिला आढळले. तेथून तिने वडिलांना माहिती दिली. मात्र त्या मुलीचे कपडे स्वच्छ होते, जराही घाण झाले नव्हते. ते पाहून पोलिसांचा संशय बळावला. तसेच तिच्या हातात महाकाल मंदिराचा धागा बांधलेला पाहून पोलिसांना अधिकच संशय आला. कडक चौकशी केली असता विद्यार्थीनीने संपूर्ण हकीकत सांगितली.

अपहरणाचे सत्य जाणून पोलीस चक्रावून गेले

पोलिसांनी कडक चौकशी केल्यानंतर अल्पवयीन मुलीने अपहरणाचा खोटा खुलासा केला. अपहरणाचे सत्य जाणून पोलीस चक्रावून गेले. विद्यार्थिनीने सांगितले की ती नापास झाली असून कुटुंबीयांची सहानुभूती मिळविण्यासाठी तिने अपहरणाची कहाणी रचली होती. वास्तविक तिचे अपहरण अजिबात झाले नाही. ही विद्यार्थिनी तिच्या कोचिंगमधून थेट उज्जैनला महाकालच्या दर्शनासाठी गेली होती. तेथून परतल्यानंतर ती धर्मपुरी येथे आली आणि तिने वडिलांना अपहरणाची माहिती दिली. पोलिसांनी अल्पवयीन मुलीची चांगलीच समजूत काढल्यानंतर तिला तिच्या वडिलांच्या ताब्यात दिले.