दिल्लीत महादरोडा, 2 कोटींचे दागिने चोरले, खाकी वर्दीत आले, डोळ्यात मिर्ची पावडर, काय घडलं?
घटनेचं गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी सदर प्रकरणाचा वेगाने तपास सुरु केला आहे. या घटनेत काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलंय. लवकरच आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी म्हटलंय.
नवी दिल्लीः दिल्लीतल्या पहाडगंज (Delhi Pahadganj) परिसरात आज पहाटेच मोठा दरोडा (Delhi Loot) पडल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी जवळपास 2 कोटी रुपये किंमतीचे दागिने दरोडेखोरांनी हातोहात पळवले. विशेष म्हणजे हा दरोडा मोठा प्लॅन रचून टाकण्यात आल्याचं दिसतंय. कारण दरोडेखोर हे पोलिसांच्या खाकी (Police uniform) वर्दीत आले होते. कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीची पावडर टाकून त्यांनी हे दागिने पळवले. बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांना या दरोड्याबाबत काही महत्त्वाचे पुरावे मिळाले असून लवकरच आरोपींना अटक होऊ शकते.
दागिने चंदिगड, लुधियानाला जात होते…
या घटनेविषयी सध्या हाती आलेल्या माहितीनुसार, एका कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून दरोडेखोरांनी हे दागिने पळवले. ही ज्वेलरी चंदिगड आणि लुधियानाला पाठवली जात होती. घटनेविषयी माहिती देताना पोलीस म्हणाले, ‘ पहाटे 4.49 वाजेच्या सुमारास आम्हाला कॉल आला. पहाडगंजमध्ये दोन व्यक्तींनी एका माणसाच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. त्यातून काही सामान चोरून नेले. संपूर्ण तपासानंतर पोलिसांना कळलं की या लोकांकडे एक ज्वेलरी बॉक्स होता. तो चंदिगडहून लुधियानाला जात होता. रस्त्यात चार लोकांनी कुरिअरच्या कर्मचाऱ्यांना लुटलं. यापैकी एक आरोपी पोलिसांच्या खाकी वर्दीत होता….
खाकी वर्दीत आले होते…
पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या घटनेतील आरोप खाकी वर्दीत आला होता. आधी त्याने कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांची चेकिंग करायचे म्हणून थांबवले. तेवढ्यात मागील बाजूने आणखी दोघे आले. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या डोळ्यासमोर अचानक अंधार झाला. या दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांच्या हातातल्या बॅग आणि बॉक्स चोरून नेले. कंपनीने दावा केलाय की, या बॉक्समध्ये जवळपास2 कोटी रुपयांचे दागिने होते. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी सदर प्रकरणाचा वेगाने तपास सुरु केला आहे. या घटनेत काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलंय. लवकरच आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी म्हटलंय.