या जिल्ह्यात वनरक्षकाला पाच-सहा जणांची बेदम मारहाण, मोटारसायकल पेटवली, चिखलाने माखलेल्या अवस्थेत…
मोटार सायकल अडवून मारहाण करण्यात आल्याने नितेश मनोहर राऊत एकदम भयभीत झाला होता. त्याचबरोबर त्याच्या अंगावरील कपडे सुध्दा चिखलाने माखले होते.

शाहिद पठाण, गोंदिया : जिल्ह्याच्या तिरोडा वनविभागात (Tiroda forest department) येत असलेल्या नागझिरा (nagzira) वनक्षेत्रात कार्यरत असलेल्या वनरक्षकाला मारहाण करून त्याची मोटारसायकल जाळल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. नितेश मनोहर राऊत ( 29, रा. झांजीया ) असे मारहाण करण्यात आलेल्या वनरक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी नितेशचा मित्र वनरक्षक अमित मुलचंद नाईक (रा. तिरोडा ) याच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिस ठाण्यात (gondia police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्यांना मारहाण करण्यात आली आहे. त्याबरोबर मोटारसायकल जाळल्यामुळे वनरक्षक अधिक भयभीत झाला होता अशी माहिती मिळाली आहे.
दुचाकी अडवून शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण
फिर्यादीचा मित्र वनरक्षक नितेश राऊत हा त्याच्याकडे अत्यंत भेदरलेला व चिखलाने माखलेल्या अवस्थेत आला होता. यावेळी त्यास याबाबत विचारणा केली असता, त्याने झांजीयावरून दुचाकीने तिरोड्याकडे येत असताना इंदोरा खुर्द गावाजवळील वाघदेव परिसरात बोदलकसा तलावाच्या बाजूच्या डांबरी रस्त्यावर पाच-सहा व्यक्तींनी त्याची दुचाकी अडवून शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तर दुचाकीही पेटवून दिल्याचे सांगितले. त्या दरम्यान, दुसऱ्या दिवशी पोलिसांत तक्रार देऊ असे म्हणत रात्री दोघेही झोपी गेले.
संशय आल्याने त्याने तिरोडा पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदविली
मात्र, पहाटे नितेश परत येतो जोडीदाराला सांगून निघून गेला. परंतु, तो परत आला नाही. यावर फिर्यादी वनरक्षक अमित नाईक यांना संशय आल्याने त्याने तिरोडा पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदविली आहे. यावर तिरोडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. त्याचबरोबर पोलिस वनरक्षकाचा शोध घेत आहेत.



मोटार सायकल अडवून मारहाण करण्यात आल्याने नितेश मनोहर राऊत एकदम भयभीत झाला होता. त्याचबरोबर त्याच्या अंगावरील कपडे सुध्दा चिखलाने माखले होते. रात्री घरी जातो असं सांगून बेपत्ता झालेला वनरक्षक अद्याप गायब आहे.