गुगल सर्च हिस्ट्रीमुळे अखेर तो पोलिसांच्या कचाट्यात सापडला, उलगडला खुनाचा गुन्हा
दोन अयशस्वी विवाहानंतर, सुचित्रा पुन्हा लग्न करण्यास इच्छुक नव्हती, परंतु तिला आई होण्याची इच्छा होती. तिने प्रशांतसमोर मूल हवे असल्याची इच्छा व्यक्त केली होती
तिरूअनंतपुरम : केरळच्या कोल्लम कोर्टाने एका खुनाच्या (murder) आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण 20 मार्च 2020 चे आहे, जेव्हा पलक्कड जिल्ह्यातील एका व्यक्तीने गुगल सर्चमध्ये (google search history) पत्नीला कसे मारायचे, हे सर्च केले होते. त्यानंतर काही वेळातच, 33 वर्षीय प्रशांत नांबियारने त्याची मैत्रीण सुचित्रा पिल्लई (42) हिची गळा दाबून खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर रात्री पुन्हा प्रशांतने पुन्हा ऑनलाइन येऊन मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची, हेही सर्च केले. एवढेच नव्हे तर त्याने काही चित्रपट पाहून पोलिसांना चकवा देण्याचा एक मार्गही शोधून ठेवला. एवढं सगळ केल्यानंतर त्याने सुचित्राच्या मृतदेहाचे तुकडे करून घरामागील खड्ड्यात पुरले, असे पोलिसांनी सांगितले.
हे संपूर्ण प्रकरण तीन वर्षांपूर्वी घडलं असलं तरी न्यायालयाने त्याला आता दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. संगीत शिक्षक असलेल्या प्रशांतला कोल्लम अतिरिक्त सत्र न्यायालय-१ ने सोमवारी याच जिल्ह्यातील नादुविलक्करा गावात राहणाऱ्या सुचित्राच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रशांतला 14 वर्षांचा तुरुंगवास आणि 2.5 लाख रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे. या दोन्ही शिक्षा त्याला एकाचवेळी भोगाव्या लागतील.
2019 साली झाली होती भेट
सुचित्रा ही प्रशांतच्या पत्नीची दूरची नातेवाईक होती. 2019 मध्ये त्यांच्या मुलाच्या नामकरण समारंभात दोघे पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर त्यांचं नातं सुरू झालं. दोनदा घटस्फोट झालेल्या सुचित्राला पुन्हा लग्न करण्यात रस नव्हता. मात्र तिला तिचे मूल हवे होते. यासाठी तिने प्रशांतकडे हट्ट केला होता पण त्याचे आधीच लग्न झाले होते. दरम्यान, प्रशांतने तिच्याकडून 2.56 लाख रुपयेही घेतले. मुलासाठी होकार दिल्यास आपलं अफेअर उघडकीस येईल, अशी भीती प्रशांतला वाटत होती.
वैतागून आखला हत्येचा प्लान
सुचित्राच्या बाळाच्या हट्टाला कंटाळून त्याने सुचित्राला मारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तो तिला पलक्कड येथील भाड्याच्या घरात घेऊन गेला. आरोपपत्रानुसार, प्रशांतने मार्चमध्ये काही दिवस एकत्र राहणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, त्याने पत्नी आणि मुलाला कोल्लम येथील घरी तर त्याच्या आई-वडिलांना कोझिकोड येथे पाठवले.
पोलिसांनी दोघांच्या व्हॉट्सॲप चॅट्सही जप्त केले आहेत, ज्यात असे दिसून येते की प्रशांतने सुचित्राला काळ्या रंगाचा ड्रेस घालण्यास सांगितले होते. ती रात्री त्याच्या घरात शिरेल तेव्हा कोणी तिला पाहू नये, असा त्याचा हेतू होता. त्यानुसार, 17 मार्च रोजी सकाळी सुचित्रा घरातून निघाली आणि कोल्लममधील ब्युटीशियन ट्रेनिंग अकादमीमध्ये गेली.
घरात खोटं सांगून निघाली होती सुचित्रा
सुचित्राने घराक खोटं सांगितलं होतं की कोचीला एका क्लाससाठी जात आहे. तर दुपारी तिच्या कामाच्या ठिकाणाहूनही ती खोटंच सांगून बाहेर पडली होती. त्या संध्याकाळी, प्रशांतने तिला कोल्लममधील हायवेच्या निर्जन भागातून पिक केले आणि ते दोघे 270 किमी दूर असलेल्या पलक्कड येथे नेले. त्यानंतर दोघेही 20 मार्चपर्यंत प्रशांतच्या घरी थांबले. सुचित्राने कामाच्या ठिकाणी सुट्टी टाकली होती आणि आपण 22 मार्चला परत येणार असल्याचं कुटुंबीयांना सांगितलं.
20 मार्च 2020 रोजी प्रशांतने केली हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, 20 मार्चच्या संध्याकाळी प्रशांतने सुचित्रावर हल्ला केला. ती जमिनीवर पडताच प्रशांतने तिच्या अंगावर बसून दोन्ही गुडघे तिच्या छातीवर दाबले. तिचा गळा दाबण्यासाठी त्याने विजेच्या तारेचा वापर केला. हत्येनंतर त्याने तिचा मृतदेह चादरीने झाकला.
पोलिसांपासून वाचण्यासाठी तयार केला प्लान
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येनंतर प्रशांत नंतर त्रिशूरला निघून गेला. तेव्हा त्याने सुचित्राचा मोबाईल फोनही घेतला, तो काही काळ बंद होता. तपास करणार्यांची दिशाभूल करण्यासाठी प्रशांतने त्रिशूरमधील मननुथी पोलिस स्टेशनजवळ सुचित्राचा फोन ऑन केला. ती त्या ठिकाणी आहे, हे दाखवण्यासाठी त्याने काही वेळ फोन चालू ठेवला. नंतर, त्याने तिचा फोन आणि सिम तोडले आणि पलक्कडला परतण्यापूर्वी मनुथीपासून 9 किमी अंतरावर असलेल्या नडथारा येथे दोन्ही गोष्टी फेकून दिल्या.
मृतदेहाची विल्हेवाट लावली
घरी पोहोचताच प्रशांतने सुचित्राच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याने घराच्या मागे एक खड्डा खणून तिथे तिच्या शरीराच्या अवयवांची विल्हेवाट लावली. त्यानंतर शरीराच्या अवयवांवर पेट्रोल शिंपडून अवशेष जाळले. तसेच कुत्र्यांनी मृतदेह खोदून बाहेर काढू नये म्हणून तो खड्डा दगड आणि सिमेंटने झाकला. यानंतर त्याने तिचे कपडे व रक्ताने माखलेल्या इतर सर्व वस्तू जाळून टाकल्या.
23 मार्च रोजी पोलिसांपर्यंत पोहोचले प्रकरण
बरेच दिवस उलटून गेल्यानंतरही सुचित्रा घरी न आल्याने तिचे कुटुंबिय काळजी करत होते. त्यांनी ती काम करत असलेल्या ब्युटीशियन अकादमीमध्ये चौकशी केली असता तिने तिच्या कार्यालयात खोटं सांगितल्याचं आढळलं. यानंतर 23 मार्च रोजी कुटुंबीयांनी स्थानिक पोलिसांकडे सुचित्रा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी सुचित्राची कॉल हिस्ट्री चेक करून प्रशांतला अटक केली.
सोशल मीडियावरून डिलीट केले चॅट्स
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांतने सर्व सोशल मीडिया अकाउंटवरून त्याचे चॅट डिलीट केले होते. पण पोलिसांनी सायबर फॉरेन्सिक तज्ञांच्या मदतीने संभाषण परत मिळवले. सुचित्राची महाराष्ट्रात एक मैत्रिण असून ती तिथे गेली असावी, असे सांगून प्रशांतने तपास यंत्रणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कोविड लॉकडाऊनमुळे तपासालाही आव्हानांचा सामना करावा लागला होता.
तपास अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, प्रशांतच्या कॉल हिस्ट्रीव्यतिरिक्त पोलिसांनी इंटरनेट डिटेल्सही परत मिळवले. ज्यामुळे त्यांना त्याचा मोबाइल ट्रॅक करण्यास मदत झाली. या प्रकरणातील यश प्रशांतच्या गुगल सर्चमधून मिळाले. यामध्ये त्याने अध्यात्मिक गुरुने आपल्या पत्नीची हत्या कशी केली याचा शोध घेतला होता. तसेच हत्येनंतरही त्याने ऑनलाइन लॉग इन केले होते. आणि मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याबद्दल इंटरनेटवर शोध घेतला. काही चित्रपटही पाहिले ज्यात नायक पोलिसांना फसवण्यात यशस्वी झाला होता.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने पुराव्यावरच अवलंबून राहावे लागले. गुन्ह्यात आरोपीचा सहभाग असल्याचे सिद्ध करण्यासाठी आम्ही परिस्थितीजन्य (Circumstantial) पुरावे सादर केले होते. याशिवाय सायबर पुराव्यांमुळे खटला सिद्ध करण्यासही मदत झाली.