गोविंदा याच्यासह काही बॉलिवूड कलाकारांची अडचण वाढणार ? प्रकरण थेट पाकिस्तानशी संबंधित; काय आहे प्रकरण ?
सौरभ चंद्राकर आणि त्याच्या साथीदारांची सध्या ईडीकडून कसून चौकशी सुरू आहे. त्यातून बरीच नवनवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणात अनेक बॉलिवूड कलाकारांची नावेही समोर आली असून त्यांच्यावर चौकशीची तलवार लटकत आहे.
मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : महादेव ॲपप्रकरणी प्रमोटर्स सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांची सध्या ईडीकडून कसून चौकशी सुरू आहे. यामध्ये रोज नवनवे खुलासे होत असून बरीच माहिती समोर येत आहे. या ॲपप्रकरणात अनेक बॉलिवूड कलाकारांची नावेही समोर आली असून त्यांच्यावर चौकशीची तलवार लटकत आहे.
दरम्यान, ईडीने केलेल्या तपासामध्ये त्यांना असं आढळून आलं की सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल, पाकिस्तानमध्ये खेल यार बेटिंग ॲप ऑपरेट करण्यासाठी डी-कंपनीशी सहकार्य करत होते. “डी” च्या सूचनेनुसार चंद्राकरने ॲप ऑपरेट करण्यासाठी दाऊद इब्राहिमचा भाऊ मुस्तकीम इब्राहिम कासकरसोबत भागीदारी केल्याची धक्कायाक माहिती उघड झाल्याची माहिती समोर आली आहे.
कोविड-19 महामारीनंतर 2021 मध्ये ही भागीदारी झाल्याचे समोर आल्याचे अंमलबजावणी संचालनालयातील (ईडी) उच्च पदस्थ अधिकार्यांनी सांगितले. त्याशिवाय, मुस्तकीम हा पाकिस्तानमधील बेटिंग बिझनेसवर देखरेख करतो तसेच चंद्राकरच्या ॲपसाठी सुरक्षा आणि लॉजिस्टिक सपोर्टही देतो, असे एफपीजेच्या बातमीत नमूद करण्यात आले आहे.
सेलिब्रिटी एंडोर्समेंट
अभिनेता गोविंदा, रणदीप हूडा, नील नितीन मुकेश, डेझी शहा, रश्मी देसाई आणि शेफाली जरीवाला यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी व्हिडीओ क्लिपद्वारे या ॲपची एंडोर्समेंट (जाहिरात ) केली आहे.
‘खेलोयार’ ॲप हे महादेव बुक ॲपसारखाच एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. त्यावर क्रिकेट, फुटबॉल, टेनिस आणि कॅसिनो गेम्स सारखे गेम ऑफर करते. त्यावर जिन्ना चलन वापरून पैज लावणे आणि जिंकणे शक्य आहे. हे ॲप सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्या नेतृत्वाखालील असून ते डी कंपनीच्या नेटवर्कशी संबंधित आहे असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच खेलोयार गेमिंग ॲप हे लंका प्रीमियर लीग (LPL), या श्रीलंकेच्या T20 क्रिकेट स्पर्धेसाठी, प्रायोजकांपैकी एक होते. विशेष म्हणजे, हे ॲप भारतात देखील कार्यरत आहे. UPI, क्रेडिट आणि डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे यावरील व्यवहार करण्याची सोय आहे.
सौरभ चंद्राकरची कसून चौकशी
दरम्यान महादेव ॲप संदर्भात सौरभ चंद्राकर व त्याच्या साथीदारांची बरीच चौकशी करण्यात येत आहे. त्याने साथीदारांसह कोट्यवधींची संपत्ती जमवली असून त्याच पैशांतून त्याने विविध ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले. चंद्राकर हा त्याचे 5-स्टार हॉटेल आणि विविध सुविधांनी युक्त असे रिसॉर्ट विकसित करण्यासाठी मुंबईजवळ एक मोठी जमीन घेण्याचा विचार करत होता, अशी माहिती उघड झाली आहे. ईडीतर्फे त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
बॉलिवूड कनेक्शन
सौरभ चंद्राकर त्याच्या लग्नामुळे चर्चेत आला. फेब्रुवारी 2023 मध्ये दुबई मध्ये झालेल्या लग्नसोहळ्यासाठी चंद्राकर याने पाण्यासारखा पैसा खर्च केला . बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी या सोहळ्यासाठी उपस्थित होते, त्यांनी परफॉर्मन्सही दिला. महादेव ॲप प्रकरणात अनेक सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आहेत. रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, कपिल शर्मा, मलायका अरोरा, सुनील शेट्टी, सोनू सूद, संजय दत्त, हार्डी संधू, सुनिल ग्रोव्हर, सोनाक्षी सिन्हा, रश्मिका मंधाना, सारा अली खान, गुरु रंधावा, टायगर श्रॉफ, रफ्तार, एम्सी दिप्ती साधवानी, यांसारख्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची नावे याप्रकरणी समोर आली आहेत.