गुमला : झारखंडमधील गुमला जिल्ह्यात एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. जादूटोण्याच्या संशयातून नातवानेच चुलत आजी-आजोबांची हत्या केल्याची घटना घडली आहे. बिशुनपूर पोलीस ठाण्यांतर्गत हडूप रिसापथ गावात ही घटना घडली. तुरी ओराव आणि नयहारी देवी अशी हत्या करण्यात आलेल्या वृद्ध जोडप्याची नावे आहेत. आजी-आजोबांची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात शरण आला. इंद्रनाथ ओराव असे आरोपी नातवाचे नाव आहे. वृ्द्ध जोडप्याला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. यात दोघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
इंद्रनाथला रात्री स्वप्न पडले की, त्याचे आजी-आजोबांना जादूटोणा करून त्याला आणि त्याच्या आईला मारायचे आहे. यानंतर इंद्रनाथने दादा तुरी ओराव याला त्याच्या शेताजवळ गाठले आणि लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे तुरीची पत्नी नयहारी देवी हिने पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पतीची हत्या झाल्याचे पाहून ती शेतातून पळून आपल्या घरी आली. मात्र इंद्रनाथने तिचा पाठलाग करत तिच्या घरात घुसून आजीला काठीने बेदम मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला.
आजी-आजोबांची हत्या केल्यानंतर इंद्रनाथने बिशूनपूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. अनेक दिवसांपासून आजोबा आणि नातवामध्ये जमिनीवरून वाद सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आरोपी नातवाची चौकशी करत आहेत. जमिनीच्या वादातून आणि अंधश्रद्धेतून वृद्ध जोडप्याची हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते, असे बिशूनपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी कुंदन कुमार यांनी सांगितले. आरोपी इंद्रनाथ याला अटक करण्यात आली आहे.