नाशिक : शेतकऱ्यांवरील सुरू असलेली संकटांची मालिका काही केल्या कमी व्हायला तयार नाहीये. नुकतेच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे ( Nashik Farmer ) मोठे नुकसान झालेले आहे. अशातच शेतीमाल कसाबसा वाचविला असला तरी शेतकरी दिवसभर कष्ट करून रात्री गाड झोपलेला असतांना त्याच्या शेतमालावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. नाशिक जिल्ह्यातील ( Nashik News ) निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील द्राक्षबागेत द्राक्ष पिकाची चोरी झाली आहे. प्रगतशील शेतकरी केशवराव मोरे यांच्या द्राक्ष बागेतून रात्रीतून द्राक्ष चोरीला गेले आहे. जम्बो व्हरायटीची द्राक्षबाग असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 15 ते 20 क्विंटल द्राक्ष तोडून नेल्याची घटना समोर आलेली आहे.
केशवराव मोरे यांचा बाग खरतंर काढणीला आला होता. त्यामध्ये चोरट्यांनी डल्ला मारल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी केशवराव मोरे यांच्या अक्षरशः तोंडचे पाणी पळाले असून त्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे.
ज्या रात्री द्राक्ष चोरीची घटना घडली आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशीच सकाळी द्राक्ष काढणीसाठी मजूर येणार होते. त्यामुळे चोरट्यांनी द्राक्ष पिकावर मारलेला डल्ला कुणी मारला याची चर्चा सुरू झाली आहे.
यामधील विशेष बाब म्हणजे एका रात्रीत जवळपास दीड लाखांच्या द्राक्षावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. अस्मानी संकट कोसळलेले असतांना आता पुन्हा एका नवे संकट कोसळले आहे. त्यामुळे संकटांची मालिका कधी संपणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडू लागला आहे.
स्वतःच्या मुलांना सुद्धा इतका जीव लावला नसेल इतका जीव लावून द्राक्ष बाग काढणीसाठी आला होता. अशातच एका रात्रीतून बागतील द्राक्ष चोरीला गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. अद्याप गुन्हा दाखल नसला तरी चोरट्यांचा शोध घेऊ असे आश्वस्त करण्यात आले आहे.