काय भयंकर डोकंय आजच्या मुलांचं? अभ्यासाची कटकट नको म्हणून रचला कट… कहाणी अशी बनवली की…
अभ्यास टाळण्यासाठी पोरं काय डोक लावतील काही नेम नाही. वेगवेगळ्या आयडिया कशा सुचतात यांना ? अशाच एका आयडियामुळे पोलिसांचा अख्खा फौजफाटा कामाला लागला, आरोपींचा कसून शोधही घेतला पण समोर जे सत्य आलं ते पाहून सर्वांनी डोक्यालाच हात लावला.
राजकोट | 16 सप्टेंबर 2023 : बऱ्याचशा मुलांना अभ्यास करायला (studying) आवडत नाही, तर काहींना त्याचा कंटाळा येतो. अभ्यास करायला लागू नये म्हणून मुलं काय-काय आयडिया काढत असतात. कधी कोणाचं पोटचं दुखतं, तर कोणाच्या हातातच वेदना होतात. अशी अनेक मुलांची उदाहरणं तुम्हीदेखील पाहिली आणि ऐकली असतील. पण गुजरातमधल्या एका चिमुरडीने अभ्यासाची कटकट नको ( in order to avoid study) म्हणून जे डोकं लढवलं ते पाहून सर्वांनाचा डोक्याला हात लावायची वेळ आली.
गुजरातच्या राजकोटमध्य राहणाऱ्या एका 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने ट्युशनला (क्लासला) जायला लागू नये म्हणून स्वत:च्या अपहरणाच बनाव रचला. क्लासमध्ये दिलेला घरचा अभ्यास पूर्ण न झाल्याने तिने हे पाऊल उचलले. अभ्यास न केल्याने शिक्षक ओरडतील, शिक्षा करतील याची भीती त्या मुलीला वाटत होती. त्यातूनच तिने हा प्लान रचला. मुलीच्या अपहरणाची तक्रार करण्यासाठी मुलीच्या आईने त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर गुजरात पोलिसांनी अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी मोठी कारवाई सुरू केली होती.
पोलिसांनी सुरू केली कारवाई
मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत शोधमोहिम सुरू केली खरी पण त्यातून जे सत्य समोर आलं, त्याने सर्वांनाच धक्का बसला. त्या अल्पवयीन मुलीने स्वत:चे अपहरण झाल्याची खोटी कहाणी रचली होती. अपहरणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यास सुरूवात केली. त्यांनी शहरात नाकाबंदी करून मुलीचा शोध घेण्यासाठी अन्य पावलेही उचलली. पोलिस कंट्रोल रूमशी संपर्क साधूनही मुलीचा शोध सुरू केला. मात्र त्या मुलीने तिच्या अपहरणाची कहाणी रचली होती असे नंतर स्पष्ट झाले.
काळ्या थार जीपमध्ये घेऊन गेले आरोपी
ही मुलगी गुजरातच्या राजकोट भागातील पोपटपारा भागातील रहिवासी आहे. . संध्याकाळी ती ट्यूशनसाठी निघाली पण क्लासला गेलीच नाही, उलट थोड्या वेळाने ती घरी परत आली आणि आपले अपहरण झाले होते, असे तिने आईला सांगितले. अपहरण केल्यानंतर आरोपींनी मला काळ्या रंगाच्या थार जीपमध्ये बसवले आणि घेऊन गेले,असेही तिने नमूद केले.
कशीबशी केली सुटका
अपहरणकर्त्यांपासून सुटका करण्यासाठी तिने त्यांना दगड मारले आणि तिथून पळून आली, अशी कहाणीही तिने आईल सांगितली. तिच्यासोबत आणखीही एका मुलीचे अपहरण करून तिलाही त्या जीपमध्ये बसवण्यात आले होते, असेही तिने आईला सांगितले. मुलीने कथन केलेला प्रकार ऐकून आई घाबरली आणि तिने पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांच्या चौकशीत उघड झाला खरा प्रकार
त्यानंतर पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला आणि मुलीकडे अपहरणाच्या घटनेबद्दल चौकशी केली. ज्या भागातून मुलीचे अपहरण झाले, त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी स्कॅन केले, मात्र तेव्हा त्या भागात एकही जीप न दिसल्याने त्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी त्या मुलीची पुन्हा कसून चौकशी केली असता त्या मुलीने सगळं खरं सांगितलं. आपल्या अपहरणाबद्दल आईशी खोटे बोलल्याचे तिने कबूल केले. क्लासला जायचं नव्हतं म्हणूनच अपहरणाचा बनाव रचल्याचेही तिने सांगितले.