बेवारस कुत्र्यांचा हैदौस; आईपासून महिन्याभराचे बाळ हिरावले
बाळाच्या वडिलांना टीबी वॉर्डात उपचारासाठी भरती केले होते. बाळाची आई बाळाला घेऊन रुग्णाची काळजी घेत होती. तिला रात्री झोप लागली.
जयपूर : सरकारी रुग्णालयातील बेपर्वाईची घटना समोर आली. सोमवारी रात्री एक महिन्याच्या नवजात शिशूला वॉर्डातून कुत्रे उचलून घेऊन गेला. पोलिसांनी मंगळवारीही माहिती दिली. राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात एक रुग्णालयात आपल्या आईसोबत नवजात शिशू झोपला होता. बेवारस कुत्रा आला नि त्याला उचलून घेऊन गेला. कुत्र्यांच्या हल्ल्यात या नवजात शिशूचा मृ्त्यू झाला. पोलिसांनी सांगितलं की, रुग्णालयाच्या बाहेर या बाळाचा मृतदेह सापडला. सीसीटीव्ही फुटेजवरून ही घटना उघडकीस आली. नवजात शिशूला कुत्रा घेऊन जाताना दिसला. त्यानंतर रुग्णालयाबाहेर या नवजात शिशूचा मृतदेह सापडला.
तक्रारीनंतर गुन्हा दाखल
कोतवाली ठाण्याचे प्रभारी सीताराम यांनी सांगितलं की, बाळाच्या वडिलांना टीबी वॉर्डात उपचारासाठी भरती केले होते. बाळाची आई बाळाला घेऊन रुग्णाची काळजी घेत होती. तिला रात्री झोप लागली. रुग्णालयातील कर्मचारीही टीबी वॉर्डात उपस्थित नव्हता. बाळाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
आई जागी होताच बाळ दिसले नाही
सिरोही जिल्हा रुग्णालयात मुख्य चिकित्सक वीरेंद्र म्हणाले, परिचारक झोपी गेला होता. रुग्णालयातील गार्ड दुसऱ्या वॉर्डात काम करत होता. बाळाच्या आईला तसेच आजूबाजूच्यांना झोप लागली होती. अशावेळी हा कुत्रा आला. बाळाला घेऊन गेला. तेव्हा ही गोष्टी लक्षात आली नाही. बाळाची आई उठली तेव्हा तिला बाळ दिसला नाही. त्यानंतर विचारपूस सुरू झाली. बाळाची शोधाशोध करण्यात आली. त्यानंतर ही दुर्देवी घटना उघडकीस आली.
या घटनेमुळे सरकारी रुग्णालयाती दुरावस्था पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. काही सरकारी रुग्णालयांमध्ये अजूनही सुविधा नाहीत. त्यामुळे उघड्यावर राहण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर येते. त्यामुळे अशा घटना घडतात. अशा दुर्घटना थांबवण्यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवणे गरजेचे आहे. तसेच कुत्र्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. बेवारस कुत्रे बऱ्याच ठिकाणी हैदोस घालत असतात. रुग्णालयातील बाळ सुरक्षित नाहीत. तर मग कुठले अशा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो.