मुंबई । 7 ऑगस्ट 2023 : पाकिस्तानची सीमा हैदर गेल्या चार महिन्यांपासून भारतात रहात आहे. 13 मे रोजी पाकिस्तानातून नेपाळमार्गे ती भारतात आली. प्रियकर सचिन याच्यासह ती रबुपुरातल्या आंबेडकर नगरमध्ये घर भाड्याने घेऊन राहत होती. पोलिसांना याची कुणकुण लागली. पण, त्याआधीच सीमा, चार मुले आणि सचिनसह फरार झाली होती. मात्र, पोलिसांनी त्यांना हरियाणामधल्या वल्लभगढ भागातून 4 जुलै रोजी पकडलं.
सीमा हैदर स्वतःला साधी मुलगी सांगत असून प्रेमाखातर इथे आल्याचं ती सांगतेय. तिला अटक केल्यानंतर अनेक कथा चर्चेत आल्या. सीमा हिला भारतातच राहू द्यावे असे म्हणत काही जण तिच्याबद्दल सहानुभूती दाखवत आहेत. काहींनी तिला चित्रपटात भूमिकांची ऑफर दिली आहे, पण, सीमा इथे ज्या पद्धतीने आली आणि सहानुभूती मिळवत आहे अगदी त्याच पध्दतीने 25 वर्षांपूर्वी एक व्यक्ती इथे आली होती.
ही कथा आहे पाकिस्तानी गुप्तहेर देसाई याची. कोल्हापुरामधील बीबी जोहरा या मुलीशी लग्न करण्यासाठी तो भारतात आला होता. सीमा हैदरप्रमाणेच तो ही प्रेमासाठी भारतात पुन्हा पुन्हा येऊ लागला. कधी सरकारी कागदपत्रे तर कधी चोरी लपून. भारतात ड्रायफ्रुट्सचा व्यवसाय करतो, असे तो सांगायचा. पत्नीचे नाव देऊन त्याने काही वर्षे भारतात राहण्याची परवानगी घेतली. देसाई यांनाही त्यांच्या प्रेमाखातर ही परवानगी मिळाली होती.
सय्यद मोहम्मद अहमद देसाई हे त्याचे पूर्ण नाव. कोल्हापुरातील तरुणीशी लग्नाच्या बहाण्याने तो पाकिस्तानातून आला. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स बनवले. त्याला इथे राहण्याची परवानगी मिळेपर्यंत कालावधी संपला. तरी त्याने भारत सोडला नाही.
इतकचं नाही तर त्याने आपल्या मुलांचे प्रवेश इथे करून घेतले. सय्यद देसाई आता आपल्या कुटुंबासह भारतात सुखी आहेत असे वाटत असतानाच ती बातमी आली. देशाची महत्त्वाची माहिती पाकिस्तानला दिली जात असल्याची खबर पुणे पोलिसांना मिळाली. तपास सुरू झाला तेव्हा मोहम्मद अहमद देसाई हे नाव पुढे आले.
पोलिसांच्या तपासामध्ये सय्यद मोहम्मद अहमद देसाई हा कराचीचा रहिवासी असून तो पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेसाठी काम करत असल्याचे समोर आले. देशातील महत्त्वाची कागदपत्रे तो पाकिस्तानला देत होता. पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला तेव्हा त्याच्याजवळ अनेक महत्त्वाची कागदपत्रे सापडली.
आयएसआयला तो अनेक गुप्त गोष्टी पाठवत असे. वर्षानुवर्षे एक सभ्य माणूस म्हणून तो राहत होता. पण, प्रत्यक्षात तो आयएसआयचा गुप्तहेर होता. सय्यद अहमद देसाई हा दोषी सिद्ध झाला आणि त्याला पाकिस्तानात हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले. सीमा हैदर ही सुध्दा इथे सामान्य मुलीसारखी राहत आहे. त्यामुळे देसाई पाकिस्तानचा गुप्तहेर असू शकतो मग सीमा हैदर का नाही? असा प्रश्न आता विचारला जात आहे.