पूजा घालूनही बायको नांदायला आली नाही, वैद्याने आणखी पैसे मागितले, मग त्याने थेट…
तो खूनाच्या आरोपाखाली तुरुंगात होता. पॅरोलवर बाहेर आला आणि त्याने लग्न केले, परंतू बायको सोडून गेल्याने त्याला पुन्हा तुरूंगात जावे लागले.
मुंबई : खूनाच्या आरोपाखाली तो साल 2018 पासून कारागृहात सजा भोगत होता. त्याला कोरोनाकाळात पॅरोल मिळाला आणि त्याचा नवा प्रवास सुरू झाला. एका मुलीबरोबर लग्न करीत त्याने आपले नविन आयुष्य सुरु केले. दिवस आनंदात जात होते. पतीचा पूर्व इतिहास माहीत नसल्याने दोघांचा संसार मस्त मजेत चालला होता. परंतू त्याच्या गुन्हेगारी इतिहास त्याच्या बायकोला कळाला आणि त्यांच्या संसाराची वाताहत झालीच शिवाय त्याला पुन्हा तुरुंगातच जावे लागले असे काय घडले त्याच्या आयुष्यात वाचा…
विनोद वासवत ऊर्फ कंदा ( वय 33 ) हा साल 2018 पासून ठाणे कारागृहात होता. त्याला कोरोनाकाळात पॅरोल मिळाला आणि त्याचा नवा प्रवास सुरू झाला. त्याने एका मुलीशी सुत जुळवून लग्न केले आणि मजेत राहू लागला. दिवस पटापट गेले. आणि त्याच्या गुन्हेगारी इतिहासाबद्दल त्याच्या पत्नीला कळले. त्यानंतर त्याची बायको परत येण्यासाठी त्याने त्याच्या ओळखीचे भिवा वैद्य ( वय 61 ) यांना वैवाहीक शांती तसेच बायको परत येण्यासाठी पूजा घालायला सांगितली.
वैद्याने आणखी पैसे मागितले
भिवा वैद्य हे जागरण आणि विधी घालत असल्याने विनोद याने त्यांना बायको परत येण्यासाठी 2 हजार रुपये दिले. परंतू बायको काही परत न आल्याने विनोद तणावात होता. घटने दिवशी 24 मे रोजी रात्री भिवा वैद्य आणि विनोद हे दोघे दारु प्यायला बसले होते. त्यानंतर ते विरार येथील मांडवी डॅम जवळ चालत गेले. त्यानंतर विनोद याने वैद्याला त्याची बायको का परत आली नाही याचा जाब विचारला. त्यानंतर वैद्याने त्याच्याकडे आणखी पुजा घालावी लागेल असे सांगत त्याच्याकडे तीन हजार रुपये मागितले. त्यामुळे चिडलेल्या विनोद याने आठ किलोच्या सिमेंटच्या ठोकळ्याने वैद्याच्या डोक्यावर अनेक घाव घालून त्याला जागीच ठार केले. त्यानंतर पोलिसांना सीसीटीव्हीत आरोपीचा चेहरा दिसला नसला तरी त्याची देहबोली ओळखता आली. पोलीस त्याच्या घरी पोहचली.
सुरक्षारक्षकाचाही डोक्यात दगड घालून खून
विरार पोलीसांना तपासात आरोपीचा पूर्व इतिहास कळाला. त्याने साल 2018 मध्ये एका आंब्याच्या फळबागेच्या सुरक्षारक्षकाचा अशाच पद्धतीने डोक्यात दगड घालून खून केल्याचे उघडकीस आले आहे. वैद्याचा खून केल्यानंतर शंभर मीटरवर घर असूनही आरोपी रात्री घरी गेला नाही. त्याने त्याच्या आईला वैद्याचा खून केल्याचे सांगितले. पोलीसांच्या भीतीने त्याची आई देखील घर सोडून गेली. आरोपी सफाळे येथील त्याच्या मित्राकडे गेला. त्याच्याकडे त्याने पैशाची मदत मागितली. परंतू त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने 26 मे रोजी सकाळी तो सफाळे वरुन रिक्षाने येताच पोलिसांनी सिरसाड फाटा येथे त्याला अटक केली.