मालकाचे सोने चोरून तो राजस्थानात लपला होता, पोलीसांनी खेळली वेगळीच चाल
दागिने पॉलीश करण्याच्या फॅक्टरीत काम करणाऱ्या नोकराने मालकाच्या क्लायंटचे सोने घेऊन परराज्यात पलायन केले होते, अखेर असा सापडला तावडीत

मुंबई : सोने पॉलिश करण्याचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्याला त्याच्याकडील नोकराने फसवल्याचा प्रकार घडला होता. हा नोकर मालकाची 453 ग्रॅम सोन्याची डीलीव्हरी मालकाच्या क्लायंटकडे न करता थेट परराज्यात पळून गेला होता. पोलीसांनी अखेर सापळा रचत त्याला परराज्यातून पकडून आणत त्याच्याकडील चोरलेले 23 लाखांचे सोने हस्तगत केले आहे. परंंतू या आरोपीला पकडण्यासाठी पोलीसांनी वेष बदलून राजस्थानातील एका फॅक्टरीत धाड टाकीत कारवाई केली आहे. पोलीसांनी नेमके काय केले पाहूया..
दहीसर पोलीसांकडे सुनील आर्य नावाचे एक व्यापारी तक्रार घेऊन आले होते. त्या व्यापाऱ्याचा चारकोप येथे सोन्याचे दागिने पॉलीश करण्याचा व्यवसाय होता. त्याच्याकडील राजू सिंग नावाच्या एका नोकराला त्याने 453 ग्रॅम सोने दहीसर येथील एका दागिन्यांच्या युनिटला पोहचविण्यासाठी दिले होते. परंतू राजू दहीसरला संबंधित ठीकाणी दागिने घेऊन पोहचलाच नसल्याचे मालकाला कळले. त्याचा फोनही बंद असल्याने आपल्या नोकरानेच गंडा घातल्याचे त्याला कळाले. त्यानंतर त्याने दहीसर पोलिसांकडे तक्रार केली. दहीसर पोलिसांनी अखेर तपास हाती घेतला.
दहीसर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपी राजू सिंग याच्या मोबाईल लोकेशन तपास पोलीसांनी केला असता ते राजस्थानातील पाली जिल्ह्यापर्यंत पोहचले. पोलिसांना कळले. केली राजू सिंग पाली येथील एका फॅक्टरीत नोकरीला आहे. परंतू त्याला पोलिस पकडायला आले आहेत. हे कळले तर तो पळून जाणार असा पोलीसांना संशय होता. मग पोलिसांनी एक आयडीया केली. या फॅक्टरीच्या बाहेर एक मोबाईलच्या सिम कार्ड विक्रीचे युनिट दिसले आणि पोलिसांनी सिम कार्ड विक्री करणाऱ्या सेल्समनचा वेष धारण केला. त्यानंतर ते राजस्थानातील फॅक्टरीत शिरले. मोबाईल सिमकार्डवर खूप चांगली ऑफर असल्याचे सांगत त्यांनी फॅक्टरीत प्रवेश मिळविला आणि आरोपी राजू सिंग याच्यावर झडप घातली. त्याच्याकडे सर्व दागिने सापडले. प्रकरण शांत झाल्यावर दागिने विकण्याची त्याची योजना होती. पोलीसांनी वेष बदलून अशाप्रकारे आरोपीला अखेर अटक केली आहे.