नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरातील हेल्मेट सक्ती शिथिल झाली होती. मात्र, आजपासून म्हणजेच 1 डिसेंबरपासून दुचाकी चालकांना नाशिक शहरात हेल्मेट बंधनकारक केले आहे. हेल्मेट नसल्यास पाचशे रुपये दंड आकारला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यासाठी काही चेकिंग पॉइंट ठरवून देण्यात आले असून वाहतुक पोलिसांचे पथक ही तपासणी करणार आहे. नाशिक पोलीसांनी पुन्हा एकदा हेल्मेट सक्तीची मोहीम हाती घेतल्याने दुचाकी चालकांना हेल्मेटचा मध्यंतरी विसर पडला होता, त्यांना पुन्हा एकदा यानिमित्ताने हेल्मेटची शोधाशोध करावी लागणार आहे. तत्कालीन आयुक्त दीपक पांडेय यांच्या बदली नंतर जयंत नाईकनवरे यांनी नाशिक शहराच्या आयुक्त पदाचा पदभार घेतला होता. मात्र, पांडेय यांनी केलेली हेल्मेट सक्ती बदलीनंतर शिथिल झाली होती. पोलीस कर्मचारीही हेल्मेट सक्तीकडे फारसे लक्ष देत नव्हते, त्यामुळे शहरात हेल्मेट सक्ती नाही असं म्हणूनच नाशिककर वावरत होते.
तत्कालीन पोलीस आयुक्त यांनी हेल्मेट बंधनकारक करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले होते, त्यापैकी बहुतांश उपक्रम हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
यापूर्वी शहरात हेल्मेट नसल्यास दोन तास समुपदेशनाचे धडे, नो पेट्रोल नो हेल्मेट, नो पेट्रोल नो हेल्मेट, हेल्मेट नसल्यास पाचशे रुपये दंडाची आकारणी असे विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते.
नाशिककरांना शिस्त लावण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्तांनी घेतलेले हे निर्णय नेहमीच वादातीत राहिले आणि अनेक निर्णयाला नाशिककरांनी कडाडून विरोध केला होता.
मात्र, काही महीने उलटल्यानंतर शहराच्या पोलीस आयुक्तांनी याबाबत पुन्हा हेल्मेट सक्ती लागू केली असून आजपासून म्हणजेच 1 डिसेंबर 2022 पासून ही कारवाई केली जाणार आहे.
स्वामीनारायण चौक, संतोष टी पॉईंट, एबीबी सर्कल, अशोक स्तंभ, गरवारे पॉईंट, पाथर्डी फाटा, बिटको चौक, बिटको कॉलेजसमोर चेकिंग होणार आहे.
सकाळी दहा ते बारा आणि सायंकाळी पाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत ठिकठिकाणी ही तपासणी केली जाणार आहे.