नवाब मलिक यांना हायकोर्टाचा दिलासा; जामीन अर्जावर प्राधान्याने सुनावणी करणार
कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नवाब मलिक यांना अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून किडनी निकामी झाल्याच्या कारणावरून कुर्ला येथील क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मुंबई / ब्रिजभान जैस्वार : महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिलासा दिला. मलिक हे गंभीर आजारी असल्याचे मान्य करीत न्यायालयाने मलिक यांच्या जामीन अर्जावर पुढील आठवड्यात मंगळवारी सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली आहे. मलिक यांनी वैद्यकीय कारणास्तव जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्याची विनंती केली होती. त्या विनंतीची दखल घेतानाच न्यायालयाने मलिक हे आजारी असल्याचे पटवून देण्याची सूचना त्यांच्या वकिलांना केली होती. त्यानुसार शुक्रवारी ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी युक्तिवाद केला आणि मलिक हे गंभीर आजारी असल्याचे पटवून दिले. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालय आता मलिक यांच्या जामीन अर्जावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मलिक यांच्यातर्फे सलग दुसऱ्या दिवशी युक्तिवाद
कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नवाब मलिक यांना अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून किडनी निकामी झाल्याच्या कारणावरून कुर्ला येथील क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार घेत आहेत. याआधी त्यांनी वैद्यकीय जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज मान्य करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन वैद्यकीय कारणावरून जामीन मंजूर करण्याची विनंती केली आहे.
याप्रकरणी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी जामीन अर्जावर सुनावणीला तयारी दर्शवली आहे. मलिक यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी गुरुवारी युक्तिवादाला सुरुवात केली होती. न्यायालयाने दिलेल्या निर्देशाला अनुसरून त्यांनी मलिक हे आजारी असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला. गुरुवारच्या सुनावणीवेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा संदर्भ देताना पीएमएलए कायद्यातील कलम 45 च्या आधारे मलिक हे जामीनासाठी पात्र असल्याचा दावा केला होता.
यानंतर सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी युक्तिवाद सुरू ठेवत अॅड. देसाई यांनी मलिक हे गंभीर आजारी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह हे न्यायालयात उपस्थित होते. मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, दाऊदची बहिण हसीना पारकरशी संगनमत केले आणि आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीने मलिक यांना गेल्या वर्षी 23फेब्रुवारीला अटक केली होती.