Aurangabad Crime: खिशात मोबाइल, काखेत ट्रान्समीटर, कानात मख्खी एअरफोन, औरंगाबादेत पोलिस चालक परीक्षेत हायटेक कॉपी केल्याचे उघड

| Updated on: Sep 09, 2021 | 1:34 PM

चिकलठाण्यातील न्यू हायस्कूल केंद्रावर आणि बीड बायपास रोडवरील एमआयटी महाविद्यालयातील केंद्रांवर अत्यंत शिताफीने कॉपी करण्याचा कट पोलिसांच्या सतर्कतेने उधळून लावला. औरंगाबादमध्ये कॉपी प्रकरणाची खळबळजनक चर्चा आहे.

Aurangabad Crime: खिशात मोबाइल, काखेत ट्रान्समीटर, कानात मख्खी एअरफोन, औरंगाबादेत पोलिस चालक परीक्षेत हायटेक कॉपी केल्याचे उघड
crime
Follow us on

औरंगाबाद: शहरातील दहा केंद्रांवर बुधवारी 24 पोलिस शिपाई चालक पदासाठीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठीच्या दोन केंद्रांवर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून कॉपी करणारे काही जण पोलिसांच्या जाळ्यात सापडले. चिकलठाण्यातील न्यू हायस्कूल केंद्र (New High School, Chikalthana ) आणि सातारा परिसरातील एमआयटी महाविद्यालयात (MIT Collage, Aurangabad) उमेदवारांनी अत्यंत चालाखीने कॉपीचे नियोजन केल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे या कॉपीमागील मास्टरमाइंडने अनेक दिवसांपासून युट्यूबवरून याचे धडे घेतल्याचेही पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

टीशर्टच्या आत टीशर्ट, त्यात उपकरणे

चिकलठाण्यातील न्यू हायस्कूल केंद्रावर उपनिरीक्षक अमरनाथ नागरे, संजय मांटे यांनी केंद्रावरील उमेदवारांची कसून तपासणी केली. त्यांना आत परीक्षेसाठी सोडले. सगळ्याच वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे होते. त्यात राहुल मदन राठोड या उमेदवाराची हालचाल संशयास्पद दिसल्याने पर्यवेक्षकाने पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांना कळवले. त्यांच्या सूचनेवरून पोलिसांनी राहुलची झडती घेतली. तेव्हा राहुलने दोन टीशर्ट घातल्याचे उघड झाले. आतल्या टीशर्टच्या खिशात मोबाइल, काखेत ट्रान्समीटर, कानात धान्याच्या दाण्याएवढ्या आकाराचे मायक्रो हेडफोन आढळले. पोलिसांनी त्याचा साथीदार सतीश राठोडलाही अटक केली.

पोलिसाच्या मुलीने 6 लाखात आणली डमी मुलगी

तर दुसरीकडे बीड बायपासवरील एमआयटी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर चक्क दोन मुलीच पकडल्या गेल्या. परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, उपनिरीक्षक शंकर शिरसाठ, अनिता फसाटे हे उमेदवारांची तपासणी करत होते. यावेळी एक मुलगी पळत आली. शिरसाठ यांनी तिला आधारकार्ड मागत जन्मतारीख विचारली. तिने चुकीची तारीख सांगितली. फसाटेंना आधार कार्डच्या छायाचित्रात तफावत जाणवली. पोलिसांचा संशय अधिकच बळावल्यानंतर तिची झडती घेतली. तिच्याही टीशर्टमध्ये लपवलेला मोबाइल आणि मायक्रो स्पाय डिव्हाइस आढळून आले. अधिक तपासणी केली असता ती डमी उमेदवार असून मूळ उमेदवार पूजा रामदास दिवेकर ही असल्याचे उघड झाले. पूजाच्या जागेवर ही अल्पवयीन मुलगी परीक्षा देण्यासाठी आली होती. पण तिचीही तयारी नसल्याने बाहेरून उत्तरे मिळवण्यासाठी तिने मायक्रोस्पाय डिव्हाइस सोबत आणले होते.

युट्यूबवरून कॉपीचे धडे, टीशर्टला शिवला खिसा

बीए द्वितीय वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या राहुलने परीक्षेची आल्यानंतर युट्यूबवर ऑनलाइन कॉपीचे धडे घेतले. तसेच सतीश राठोड या मित्रालाही मदतीसाठी तयार केले. वेबसाइटवरून ब्लूटूथ करेन्कटर, मायक्रो हेडफोन, मास्टर कार्ड असे साडे पाच हजारात विकत घेतले. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना ही उपकरणे त्याने सोबत नेली नाहीत. नंतर बाथरूममध्ये गेल्यावर खिडकीतून मित्राने त्याला मोबाइल दिला. कॅमेऱ्याने प्रश्नपत्रिकेचा फोटो काढणार, ट्रान्समीटरने मित्राला पाठवणार व कानातील एअरफोनद्वारे उत्तर मिळवणार, असा त्यांचा प्लॅन होता.
तर दुसरीकडे 23 वर्षीय पूजाने पदव्युत्तर शिक्षण घेतले असून तिचे वडील पोलिस दलात आहेत. तिने रणजित राजपूतला सहा लाख रुपयांचे कंत्राट दिले. या कामासाठी अल्पवयीन मुलगी डमी म्हणून निवडली. तिच्या टीशर्टला आतून खिसा शिवून दिला. खिशाला लहानसे छिद्र करून त्याद्वारे रणजित प्रश्नपत्रिका पाहू शकेल, असे नियोजन केले. बारावीत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या पालकांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले तर पूजाला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणातील मास्टरमाइंड रणजितच्या अटकेनंतर मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  (High tech copy scandal in police driver exam in Aurangabad, Maharashtra)

इतर बातम्या- 

Aurangabad Crime: जनावरांची चोरी करून धुमाकुळ घालणारी टोळी बैलपोळ्याच्या दिवशी जेरबंद

Aurangabad Crime: 60 किमीचा फिल्मी स्टाइल थरार, ट्रायल म्हणून कार पळवणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या