अमरावती : ज्या आई-वडिलांनी आपल्या मुलाला काबाळ कष्ट करून मोठे केले. त्याचं शिक्षण पूर्ण करून चांगल्या नोकरीवर लावले. मात्र त्याच उच्च शिक्षित मुलाने आज आपल्या त्याच आजारी असलेल्या आई व वडिलांना घराबाहेर काढले. ही धक्कादायक घटना अमरावती शहरातील नवसारी (Navsari in Amravati city) परिसरात समोर आली. मारोतराव पवार व पत्नी प्रमिला पवार (Marotrao Pawar and wife Pramila Pawar) असे वृद्ध पती-पत्नीचं नाव आहे. ते गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या मुलाकडं राहत होते. मात्र या दोघांच्या राहण्यावरून मुलगा व पत्नी यांच्यात वाद होत होता. त्यामुळं पोटच्या पोराने व सुनेनं वृद्ध आई-वडिलांना घराबाहेर काढले. सासु-सासरे शिविगाळ करतात. सुनेनं सासू-सासऱ्यां विरुद्ध गाडगे नगर पोलीस स्टेशनला (Gadge Nagar Police Station) तक्रार दिली.
चौकशीसाठी सासू-सासरे यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावले. वृद्ध आई-वडिलांचे सर्व सामान घराबाहेर काढत घराला कुलूप लावले. मुलगा व सून निघून गेले. भर उन्हात वृद्ध पती-पत्नी यांनी घराबाहेर दिवस काढला. अखेर शेगाव येथून वृद्ध महिलेची मुलगी शहरात पोहचली. त्यांना जेवायला दिले. दिवसभर उपाशी असलेल्या आई-वडिलांची भूक अखेर मुलीनं भागवली.
मुलीने आई वडिलांना न्याय मिळावा म्हणून पोलीस स्टेशन गाठले. मात्र पोलिसांनी घर हे सुनेच्या नावाने आहे. आम्ही यात काहीच करू शकत नाही, असे म्हणत मुलीलादेखील वापस पाठविले. रात्रीचे आठ वाजले तरी देखील वृद्ध आई-वडील घराबाहेर बसले. मात्र त्यांना कुणीच न्याय देऊ शकले नाही. आई-वडिलांना आता कुठे ठेवायचे असा प्रश्न आता मुलीसमोर पडला आहे.