रोज ‘क्राईम पेट्रोल’ पाहायचा, 5 वेळा ‘दृश्यम’ पाहिला, त्यानंतर त्याने आई, वडील आणि भावासोबत जे केले ते… गावकरीच काय पोलिसांच्याही पायाखालची…
दिवाळीपासून सतत क्राईम पेट्रोल पहायचा. दृश्यम हा चित्रपट तर त्याने ५ वेळा पाहिला. ते सर्व लक्षात ठेवून, त्याने हळूहळू असा प्लान रचायला सुरूवात केली, जो ऐकून गावकरीच काय पोलिसही हादरले. अत्यंत थंडपणे त्याने त्याचेच जन्मदाते, आई-वडील आणि लहान भाऊ या तिघांसोबत असं काही केलं ज्यामुळे अख्ख्या गावात खळबळ माजली. त्याने नेमकं असं काय केलं ?
रमेश चेंडके, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, हिंगोली | 15 जानेवारी 2024 : हिंगोली तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोटच्या मुलानेच आई-वडील आणि सख्ख्या भावाची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अपघाताचा बनाव रचून त्या मुलानेच आई-वडील आणि भावाला संपवलं. हिंगोली तालुक्यातील डीग्रस वाणी शिवारात आई-वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना चार दिवसांपूर्वीच घडली होती. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. मात्र आता तो अपघाती मृत्यू नसून, त्यांच्या मुलानेच ही हत्या केल्याचे समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे. तपासादरम्यान संशय आल्याने पोलिसांनी त्या कुटुंबातील मुलाची कसून चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. आई- वडील आणि भाऊ पैसे देत नाहीत व बदनामी करतात ह्याचा राग मनात धरून त्या मुलानेच तिघांची हत्या केल्याचे कबूल केले.
क्राइम पेट्रोलचे भाग, दृश्यम पाहून रचला हत्येचा कट
महेंद्र जाधव असे आरोपीचे नाव असून त्याने या हत्येसाठी दिवाळीपासूनच तयारी सुरू केली होती. आई-वडील आणि भावाला संपविण्यासाठी महेंद्रने क्राईम पेट्रोल पाहण्यास दिवाळीपासून सुरुवात केली होती. तसेच त्याने दृश्यम चित्रपटही पाच वेळा पहिला. त्यातील सर्व बारकावे लक्षात ठेवून त्याने धक्कादायक पाऊल उचलायला सुरुवात केली. आरोपी हा अविवाहित असून कामधंदा न करता राहायचा. त्याचा (मृत) लहान भाऊ, विशाल जाधव हा गावातच पाणी पुरवठा कामावर होता. मात्र ते आरोपी महेंद्रला चांगलेच खटकायचे. तो सतत आई वडील अन भावाकडून खर्चासाठी पैसे मागायचा.
या कारणामुळे आई-वडील, भावाला संपवण्याचं ठरवलं
मात्र घरचे लोक त्याला पैसे देण्यास नकार द्यायचे. तसेच तो काम करत नसल्याचे सांगून त्याची बदनामी करायचे, असा राग आरोपीच्या मनात होता. म्हणूनच त्याने या तिघांनाही संपवण्याचा कट रचण्यास सुरुवात केली.सर्वप्रथम त्याने स्वतःला झोप येत नसल्याचे खोटे कारण सांगून डॉक्टरकडून झोपेच्या गोळ्या लिहून घेतल्या आणि वाशिम येथून गोळ्या खरेदी केल्या. 9 जानेवारी रोजी आरपी महेंद्र याने सगळ्यात पहिले त्याच्या भावाला चहातून त्या गोळ्या दिल्या, आणि तो गाढ झोपेत असतानाच त्याच्या डोक्यात रॉड घालून हत्या केली. त्याच रात्री त्याने गावापासून जवळच असलेल्या नालीत भावाचे प्रेत फेकले.
आई-वडीलांनाही संपवलं
नंतर आरोपीने काही बहाणा करून आईला शेतात नेले आणि तिकडेच आईलाही संपवून तिचा मृतदेह कापसात दाबून ठेवला. आणि त्यात रात्री घरी येऊन वडिलांनाही झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर त्यांच्या डोक्यातही हत्याराने वार करून त्यांना संपवलं. नंतर त्याने दुचाकीवरून आईचा आणि वडीलांचा मृतदेह भावाच्या मृतदेहाजवळे नेऊन टाकला. तिथेच दुचाकीही टाकली. त्यानंतर त्याने घर स्वच्छ केलं.
पोलिसांना संशय
आई-वडील आणि लहान भावाचा अपघाता मृत्यू झाल्याचे आरोपी महेंद्र याने संभाजीनगर येथे राहणाऱ्या भावाला कळवलं. मात्र भाऊ येण्यापूर्वीचे त्याने मृतदेह उचलण्याची घाई केली, आणि अपघाताची नोंद करण्यासाठीही तो घाई करीत होता. तेव्हा पासूनच पोलिसांचा महेंद्रवर संशय बळावला. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी बासंबा पोलीस ठाण्याचे सपोनि विलास चवळी यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यावरून चवळी यांनी सर्वप्रथम महेंद्र याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. तेव्हा महेंद्रने सर्वप्रथम उडवाउडवीची उत्तर देत पोलिसांची दिशाभूल करण्याता प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला त्याने गुन्हा कबूल केला आणि एकेकाला कसं संपवलं याचा क्रमच सांगितला. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत