सोनसाखळी चोरी प्रकरणात, एका मल्टी नॅशनल कंपनीचा एचआरला अटक
जिल्ह्यात सोनसाखळीचे गुन्हे घडत असल्याने पोलिसांवर खूप टीका होत होती,
नवी दिल्ली : अलिकडे चेन स्नॅचिंगचे प्रकार प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे घराबाहेर पडताना दागिने घालून जाणाऱ्या महिलांनी सावधानता पूर्वक रहावे असे पोलीस नेहमीच सांगत असतात. परंतू तरीही भरदिवसा सोनसाखळी चोरी सारख्या घटना घडत असतात. अशाच एका चेनस्नॅचरला आग्रा पोलिसांनी अटक केली असून तो चक्क एका बड्या कंपनी एचआर मॅनेजर असल्याचे उघडकीस आले आहे. त्याची चौकशी करताना त्याने दिलेल्या एका मागोमाग एक धक्कादायक कबुलीने पोलीसही चक्रावले आहेत.
उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात सोनसाखळीचे गुन्हे घडत असल्याने पोलिसांवर खूप टीका होत होती. आग्रा पोलिसांना चोरांना पकडण्यात काही यश येत नव्हते, त्यामुळे पोलिसांनी अनेक प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या हाती अखेर सोनसाखळी चोर सापडला आहे. आरोपीचे नाव अभिषेक ओझा आहे. त्याची चौकशी करताना त्याने दिलेल्या एका मागोमाग एक धक्कादायक कबुलीने पोलीसही चक्रावले आहेत.
अभिषेक ओझा हा अत्यंत चांगल्या घरातील तरूण असून तो हरयाणाच्या गुरूग्राम येथील एका मल्टी नॅशनल कंपनीचा एचआर मॅनेजर आहे. ओझाने दिलेल्या कबूलीने पोलीस देखील हैराण झाले आहेत. ओझा हा एचआर मॅनेजर असून त्याला कोरोना मुळे वर्क फ्रॉम होमची ड्यूटी दिली असताना त्याने सोन साखळी चोरी करायला सुरू केल्याचे उघडकीस आले आहे.
अभिषेक ओझा हा बड्या मल्टी नॅशनल कंपनीत एचआर मॅनेजर आहे. त्याला मोठा पगार असूनही त्याने हे चोरीचे प्रकार केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याने आपल्या लॅव्हिश राहणीमानासाठी सोन साखळी चोरी करण्याचा सपाटा लावला होता असे तपासात उघडकीस आले आहे.
सोनसाखळी चोरी करण्यासाठी पिस्तूलचा वापर
आपल्या लॅव्हिश राहणीमानासाठी आपण चोरी करायचो. आपल्याला वर्क फ्रॉर्म होम दिल्याने आपल्याकडे मोकळा वेळ खूप असायचा, या मोकळ्या वेळेचा वापर आपण चोरी करण्यासाठी केल्याचे आरोपी ओझा याने पोलिसांना सांगितले आहे. लुटलेले सोने त्याने सोनू वर्मा नावाच्या एका ज्वेलरला विकल्याची कबूली दिली आहे. त्याने गुन्हा करण्यासाठी महिलांना घाबरविण्यासाठी पिस्तूलही विकत घेतले होते असा जबाबात त्याने म्हटले आहे.