सोशल मीडियावर प्रेम, मंदिरात लग्न करुन वर्षभर संसार केला, मग अचानक घरातून गेला तो परतलाच नाही
तरुणीने त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फोन बंद येत आहे. तरुणीने त्याच्या घरच्यांशीही संपर्क साधला, पण त्यांच्याकडूनही काही माहिती मिळाली नाही. यानंतर तरुणीने उत्तर प्रदेशातील जौनपूर गाठत पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.
जौनपूर : सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्यातून प्रेमसंबंध जुळण्याच्या घटना हल्ली मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. यातून फसवणुकीच्या घटनांचे प्रमाणही वाढत आहे. अशीच एक घटना उघडकीस आली आहे. महाराष्ट्रातील नागपूरमधील तरुणीचे उत्तर प्रदेशातील एका तरुणासोबत इन्स्टाग्रामवर प्रेमसंबंध जुळले. यानंतर तरुण नागपूर आला आणि त्या दोघांनी लग्न केले. लग्नानंतर दोघेही वर्षभर एकत्र राहत होते. त्यानंतर एक दिवस अचानक तिचा पती गायबच झाला. यानंतर तरुणीने उत्तर प्रदेशातील जौनपूर गाठत लवकरात लवकर पतीचा शोध घेण्याची विनंती पोलिसांना केली आहे.
दीड वर्षापूर्वी सोशल मीडियावर झाली होती ओळख
साधारण दीड वर्षापूर्वी पीडित तरुणीची इन्स्टाग्रामवर तरुणाशी ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली. दररोज दोघे एकमेकांशी बोलायचे. हळूहळू मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. यानंतर तरुण नागपुरात आला आणि त्या दोघांनी मंदिरात लग्न केले.
लग्नानंतर वर्षभराने पती अचानक गायब झाला
लग्नानंतर वर्षभर दोघे एकत्र राहत होते. दोघांचा सुखी संसार होता. त्यानंतर एक दिवस तरुणाच्या आईची तब्येत बिघडली म्हणून तो उत्तर प्रदेशात आईला भेटायला गेला आणि काही दिवसांनी परत आला. त्यानंतर पुन्हा एक दिवस तो अचानक गायब झाला.
पतीचा शोध घेण्यासाठी पत्नीची पोलिसात धाव
तरुणीने त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फोन बंद येत आहे. तरुणीने त्याच्या घरच्यांशीही संपर्क साधला, पण त्यांच्याकडूनही काही माहिती मिळाली नाही. यानंतर तरुणीने उत्तर प्रदेशातील जौनपूर गाठत पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. पतीचा लवकरात शोध घेण्याची मागणी तरुणीने पोलिसांकडे केली आहे.