Jharkhand Crime : मेव्हणीच्या प्रेमात वेडा भावोजी झाला, प्रेमाच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा ‘असा’ काटा काढला
धनबादच्या धनसार पोलीस ठाण्यांतर्गत महावीर नगरमध्ये ही घटना घडली आहे. आरोपी अनिल डोम याचे मागील चार वर्षांपासून मेहुणीसोबत प्रेम संबंध सुरू होते. त्याच्या या प्रेमसंबंधाला घरच्यांचा विशेषतः पत्नी आणि सासूबाईंचा प्रखर विरोध होता.
धनबाद : मेव्हणीवर जीव जडल्यामुळे पत्नीला चाकूने भोसकून ठार केल्याची घटना झारखंडच्या धनबाद परिसरात घडली आहे. लग्न झाल्यानंतर मेहुणीशी परिचय वाढला आणि त्यातून पत्नीऐवजी मेहुणीच अधिक आवडू लागली. प्रेमाच्या या संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पत्नीला आरोपी पतीने जीवे मारून कायमचा अडथळा दूर केला. एवढेच नव्हे तर दोघांच्या प्रेम संबंधाला विरोध करणाऱ्या सासूबाईवरही आरोपीने चाकू हल्ला केला. या चाकू हल्ल्यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला तर सासुबाई गंभीर जखमी झाली आहे. सासूवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे संपूर्ण धनबाद परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड विधानच्या विविध कलमांन्वये मारहाण, हल्ला आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
मेहुणीसोबत मागील चार वर्षांपासून प्रेम संबंध
धनबादच्या धनसार पोलीस ठाण्यांतर्गत महावीर नगरमध्ये ही घटना घडली आहे. आरोपी अनिल डोम याचे मागील चार वर्षांपासून मेहुणीसोबत प्रेम संबंध सुरू होते. त्याच्या या प्रेमसंबंधाला घरच्यांचा विशेषतः पत्नी आणि सासूबाईंचा प्रखर विरोध होता.
सासुबाईंनी आरोपी अनिलला अनेकदा सक्त ताकीदही दिली होती. मात्र अनिल प्रेम संबंध तोडायला तआर नव्हता. यावरुन अनिलचा पत्नी आणि सासुबाई सोबत भांडण झाले. याच भांडणातून आरोपी अनिलने दोघींवर चाकूने जीवघेणा हल्ला केला.
या हल्ल्यामध्ये दोघीही रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळल्या. यात अनिलच्या पत्नीचा काही क्षणांतच मृत्यू झाला तर सासू गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
आरोपी अनिलने दारूच्या नशेत केले कृत्य
घटनेच्या दिवशी आरोपी अनिल हा मद्यपान करून घरी आला होता. यादरम्यान त्याने पुन्हा एकदा मेहुणी सोबतच्या प्रेमाचा विषय काढला. यावेळी पत्नीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद विकोपाला गेला आणि या भांडणात सासूबाईंनीही तोंड घातले.
पत्नी आणि सासूबाई कायमच विरोध करीत असल्याने अनिलने दारूच्या नशेत दोघींना कायमचा धडा शिकवण्याचा निर्धार केला. त्यानंतर पुढच्या काही क्षणांत त्याने घरातील चाकू बाहेर काढत दोघींवर वार केले. या हल्ल्यात दोघी गंभीर जखमी होऊन पत्नीचा काही वेळातच मृत्यू झाला.
चाकूहल्ला करून आरोपी अनिल घरातून पळाला होता. नंतर पोलिसांनी विशेष पथक नेमून आरोपीला पकडण्यात यश मिळवले. त्याला अटक करण्यात आली असून, स्थानिक न्यायालयाने त्याची तुरुंगात रवानगी केली आहे.