पतीचे अन्य महिलेशी सूर जुळला, पत्नीचा अडथळा वाटू लागला; ‘असा’ काटला महिलेचा काटा
देवव्रतचे दुसऱ्या तरुणीसोबत सूत जुळले होते. यामुळे त्याच्या प्रेमसंबंधात पत्नी अडथळा ठरत होती.
पनवेल / रवी खरात (प्रतिनिधी) : चार दिवसांपूर्वी पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर झालेल्या महिलेच्या हत्या (Murder) प्रकरणाचा उलगडा करण्यात खांदेश्वर पोलिसांना यश आले आहे. प्रियंका रावत असे 29 वर्षीय मयत महिलेचे नाव आहे. पतीनेच सुपारी देऊन महिलेची हत्या केल्याचे पोलीस तपासात (Police Investigation) निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सहा जणांना अटक (Arrest) केली आहे. देवव्रतसिंग रावत असे आरोपीचे पतीचे नाव आहे.
प्रेमसंबंधात पत्नी ठरत होती अडथळा
देवव्रत आणि प्रियंका हे जोडपे पनवेल तालुक्यातील विहीघर येथे राहत होते. देवव्रतचे दुसऱ्या तरुणीसोबत सूत जुळले होते. यामुळे त्याच्या प्रेमसंबंधात पत्नी अडथळा ठरत होती. यामुळे पती, त्याची प्रेयसी आणि प्रेयसीच्या मित्राने कट रचून महिलेचा काटा काढला.
पतीनेच दिली पत्नीच्या हत्येची सुपारी
महिलेला संपवण्यासाठी पतीने तीन गुंडांना पाच लाखाची सुपारी दिली होती. आरोपींनी पनवेल रेल्वेस्थानकाबाहेर काही दिवस महिलेवर पाळच ठेवली होती. घटनास्थळाची रेकी केली. त्यानंतर गुरुवारी संधी साधून महिलेला संपवले.
खांदेश्वर पोलिसांना हत्येचा छडा लावण्यात यश
महिलेचा मृतदेह तिथेच टाकून आरोपींनी तेथून पलायन केले. महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर खांदेश्वर पोलीस 48 तास या प्रकरणाचा कसून तपास करत होते. अखेर या हत्येची उकल करण्यात खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्यासह पथकाला यश आलंय.
तपासादरम्यान महिलेच्या पतीनेच सुपारी देऊन तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी पतीला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता सर्व घटना उघड झाली. आरोपी पती आणि त्याच्या प्रेयसीच्या खात्यावरुन आरोपींना काही पैसे ट्रान्सफर केल्याचेही पोलिसांना आढळले.
पोलिसांनी सहा आरोपींना केली अटक
यानंतर पोलिसांनी पतीसह त्याची प्रेयसी, त्यांना मदत करणारा प्रेयसीचा मित्र आणि तिघे सुपारी किलर्स अशा एकूण सहा जणांना अटक केली आहे. परिमंडळ-2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.
सुपारी किलर्सवर बुलढाणा आणि जळगावातही गुन्हे दाखल
हत्या करणारे तिघेही आरोपी आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. आरोपींवर बुलढाणा मलकापूर पोलीस ठाण्यात, जळगावमध्ये पाचोरा पोलीस ठाण्यात सुपारी किलर्सवर याआधीही गुन्हे दाखल आहेत.