आधी प्रेमात पडला, लग्नही केले; मग पत्नीला त्याच्या पहिल्या लग्नाविषयी कळले अन्…
पहिली पत्नी असताना दुसरीशी प्रेमसंबंध आणि लग्न करणे पतीला चांगलेच अंगलट आले. दुसऱ्या पत्नीने पहिलीला सोडण्यासाठी पतीमागे तगादा लावला. अखेर पतीच्या दबावाला कंटाळलेल्या पतीने जो तोडगा काढाल तो भयंकरच.
गोड्डा : सूंडमारा नदीकिनारी सापडलेल्या महिलेच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना अटक केली असून, मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत. महिलेच्या पतीनेच आपल्या पहिली पत्नी आणि मेव्हणीच्या मदतीने ही हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. देविका असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून, ती मूळची उडिसा येथील रहिवासी आहे. तर संजय राय असे मुख्य आरोपीचे नाव आहे.
हैदराबादमध्ये संजयची देविकाशी ओळख झाली
संजय राय हा बिहारमधील बांका जिल्ह्यातील रहिवासी असून, गेल्या पाच वर्षापासून तो कामानिमित्त हैदराबाद येथे राहत होता. हैदराबादमध्ये त्याची उडिसाहून आलेल्या देविकाशी ओळख झाली. मग दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. यानंत संजयने आपल्या पहिल्या विवाहाची माहिती लपवून देविकाशी विवाह केला.
पहिल्या पत्नीला सोडण्यासाठी देविका संजयवर दबाव टाकत होती
विवाहानंतर देविकाला संजयच्या पहिल्या लग्नाविषयी कळले. यानंतर देविकाने संजयच्या मागे पहिल्या पत्नीला सोडण्यासाठी तगादा लावला होता. यामुळे दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. वादाला कंटाळलेल्या संजयने अखेर देविकाला संपवण्याचा कट रचला. यासाठी त्याला त्याची पहिली पत्नी आणि मेव्हणीने मदत केली.
फिरण्याच्या बहाण्याने झारखंडमध्ये घेऊन गेला अन्…
संजय 12 मार्च रोजी देविकाला झारखंडमधील सूंडमारा नदीकिनारी फिरण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. तेथे संजयची पहिली पत्नी आणि मेव्हणी आधीच उपस्थित होत्या. संजयने पहिली पत्नी आणि मेव्हणीच्या मदतीने देविकाची हत्या केली. हत्या केल्यानंतर देविकाचे शीर धडावेगळे केले. देविकाचा उजवा हातावरील टॅटूवरुन तिची ओळख पटू नये म्हणून तो हातही त्याने कापला. यानंतर शीर आणि हात एका पिशवीत भरुन जमिनीत गाडले.
बाकी धड तिथेच टाकून आरोपी तेथून पसार झाले. पोलिसांना महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासाअंती दोन महिलांना पकडण्यास पोलिसांना यश आले. महिलांची चौकशी केली असता सर्व घटना उघडकीस आली. पोलीस मुख्य आरोपी संजय रायचा शोध घेत आहेत.