तिचा काटा काढलाय, या बॉडी घेऊन जा… पोलिसांना फोन करून सांगितलं, लोकेशनही पाठवलं; त्यानंतर…
संशय ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. यामुळे भल्या भल्यांचे संसार उद्ध्वस्त होतात. संशयाचे भूत एकदा मानगुटीवर बसलं की ते उतरता उतरत नाही. कितीही समजवा, काहीही करा पण ते काही उतरत नाही. सूरज आणि रेखाच्या दरम्यान असंच काही झालं. सूरजच्या मानगुटीवर संशयाचं भूत बसलं आणि एका हसत्या खेळत्या संसाराची माती झाली... काय झालं होतं दोघांमध्ये? कशाबद्दल होता त्यांच्यात एवढा राग?
दुपारची वेळ होती. रणरणतं ऊन पडलेलं होतं. पोलीस आपल्या कामात व्यस्त होते. काही पोलीस गप्पांमध्ये रंगले होते. पोलीस ठाण्यात कुणाचीही ये-जा नव्हती. त्यामुळे वातावरणातही सुस्तावलेपण आलं होतं. पण तितक्यात फोनची घंटी वाजली आणि शांतता भंग झाली. समोरून एक व्यक्ती अत्यंत शांतपणे बोलत होता. मी बायकोची हत्या केलीय. तिची डेड बॉडी पडली आहे. घेऊन जा. तुम्हाला लोकेशन पाठवतो… अत्यंत सहजपणे जणू काही घडलंच नाही, अशा स्वरात ही व्यक्ती बोलत होती. पण इकडे मात्र, फोन अटेंड करणाऱ्या पोलिसाची बोबडीच वळली होती. फोन ठेवल्यानंतर त्याने आपल्या वरिष्ठांना आणि इतर सहकाऱ्यांना खबर दिली अन् सर्वांनाच शॉक बसला. वातावरणातील सुस्तावलेपणा कधीच गेला होता अन् सायरनच्या आवाजासह पोलिसांची गाडी थेट घटनास्थळी पोहोचली होती….
राजस्थानच्या जोधपूर येथील एअरपोर्ट पोलीस ठाणे परिसरातील आशापूर्णा नॅनो मॅक्स कॉलनीतील ही घटना आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तो हातात कैची घेऊन डेडबॉडीजवळ निर्विकार चैहऱ्याने बसलेला होता. पोलीस आले तरी तो जागचा हलला नाही. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी सुरू केली. काय झालं? कसं झालं? हे त्याला विचारलं. त्यानंतर त्याने पोलिसांकडे एक कटाक्ष टाकला आणि जे घडलं ते सांगू लागला. माझी बायको फोनवर खूप असायची. तास न् तास फोनवर बोलत राहायची. त्यामुळे मला तिच्या चारित्र्यावर शंका येऊ लागली. त्यावरून आमच्यात वाद होऊ लागले. सुरुवातीला किरकोळ झगडे होत होते. नंतर हे झगडे वाढतच होते, आरोपी सूरज सांगत होता. त्याची पत्नी रेखाचा खून कसा झाला याची माहिती देत होता.
टोकलं, समजावलं, पण…
मला रेखाचं फोनवरचं असं बोलणं पसंत नव्हतं. अनेकदा टोकलं, समजावलं, पण ती ऐकतच नव्हती. तिचं फोनवरचं बोलणं थांबतच नव्हतं. आमच्यात अनेकदा या विषयावरून झगडे झाले. दोन दिवसापूर्वीही कडाक्याचं वाजलं. त्यामुळे ती माहेरी गेली होती. शुक्रवारी ती परत आली. त्यामुळे आमच्यात पुन्हा वाद झाले, पुन्हा झगडा सुरू झाला. शब्दाला शब्द भिडला. यावेळी तीही फटकळपणे बोलत होती. त्यामुळेच मी तिची हत्या केली. कैचीने तिचा गळा चिरला, सूरजने ही माहिती देताच पोलीसही हादरून गेले.
सूरजला अटक
रेखाचे आईवडील कुडी भगतासनी येथे राहतात. त्यांना या घटनेची पोलिसांनी माहिती दिली आहे. रेखाचा सूरज बरोबरचा हा दुसरा विवाह होता. गेल्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये दोघांनी लग्न केलं होतं. दोघेही कुडी परिसरात राहत होते. पण सासूरवाडीत वाद होत असल्याने ते आशापूर्णा कॉलोनीत राहायला आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज डॉग केअर सेंटरमध्ये काम करत होता. तर रेखा गृहिणी होते. आता रेखाच्या हत्येनंतर तिच्या कुटुंबीयांनी सूरजवर छळ आणि हत्येचा आरोप ठेवला आहे. पोलिसांनी सूरजला अटक केली आहे. गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.