सासूने केली जावयाची चांगलीच खातिरदारी ! कपडे फाडले, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत घेऊन गेल्या पोलिसांकडे, त्याने असं काय केलं ?
पती-पत्नीच्या भांडणानंतर पत्नीच्या माहेरच्यांनी मारकुट्या जावयाची धुलाई करत त्याला चांगलीच अद्दल घडवली. त्याला मारहाण करत ते सरळ पोलिसांकडे घेऊन गेले.
लखनऊ | 25 जुलै 2023 : एका युवकाची बेदम धुलाई करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्या तरूणाला मारहाण इतर कोणी नाही तर त्याच्याच सासरच्या काही महिलांनी (in laws beat son in law) केल्याचे समोर आले आहे. मुरादाबादमधील सिव्हिल लाइन ठाणे क्षेत्रातील जिल्हा रुग्णालयाजवळ हा प्रकार घडला. जावयाने त्याच्या पत्नीला बाईकवरून धक्का देऊन पाडले, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली असा आरोप त्या तरूणावर लावण्यात आला होता. मात्र तोच तरूण त्याच्या पत्नीला उपचारांसाठी रुग्णालयातही घेऊन आला होता.
हा प्रकार पत्नीच्या कुटुंबियांना समजताच सर्वांनी जिल्हा रुग्णालय गाठले. हॉस्पिटलच्या गेटवर त्यांना त्यांचा जावई दिसला. संतापलेल्या कुटुंबियांनी जावयाचा चांगलाच समाचार घेतला. रुग्णालयाच्या गेटवरच त्यांनी जावयाला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. एवढेच नव्हे तर जखमी महिलेच्या नातेवाइकांनी जावयावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत तक्रार नोंदवली आहे.
आरोपी युवक पत्नीला करायचा मारहाण
खरंतर, सहा महिन्यांपूर्वी सिव्हिल लाइनमध्ये राहणाऱ्या सानियाचे पाक बाडा भागात राहणाऱ्या फहीमसोबत लग्न झाले होते. लग्नानंतर दोघांच्या नात्यात सगळं काही आलबेल होतं. पण काही महिन्यांनंतर फहीमचे सानियाशी भांडण झाले, त्याने तिला मारहाणही केली. सानियाने त्याला सख्त विरोध केला आणि रागाच्या भरात तिच्या माहेरी गेली. काही दिवसांनंतर फहीम एका पहाटे सानियाकडे पोहोचला आणि तिला बाईकवर बसवून बाहेर निघून गेला.
सासरच्यांनी केली धुलाई, कपडेही फाडले
तिच्या कुटुंबियांनीसानिया बेपत्ता झाल्याची तक्रार सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात नोंदवली. अखेर सानिया जखमी झाल्याने ती रुग्णालयात दाखल असल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली असता ते घाईघाईने जिल्हा रुग्णालयात पोहोचले. तेथे सानिया त्यांना गंभीरिरित्या जखमी अवस्थेत आढळली. यामुळे दु:खी झालेले कुटुंबिया रुग्णालयाच्या बाहेर येत असताना त्यांना तेथे सानियाचा नवरा, फहीम दिसला. संतप्त कुटुंबियांनी तेथेच त्याला बेदम मारहाण केली.
पत्नीला बाईकवरून धक्का दिला, डोकंही फुटलं
फहीम सानियाला माहेरच्या घरातून घेऊन बाहेर गेला. तेथे त्याने मला चालत्या बाईकवरून ढकलले, त्यामुळे डोकं फुटलं आणि रक्तस्त्राव झाला, असे सानियाने नमूद केले. तिच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या सर्व प्रकरणामुळे सानियाच्या माहेरचे संतापले आणि त्यांनी फहीमला मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात देऊन कायदेशीर कारवाईची मागणी केली. त्याची एवढी बेदम धुलाई झाली होती की त्याचे कपडेही फाटले होते. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.