एक कप कॉफी आणि तो थेट पोचला हॉस्पिटलमध्ये… अनुजसोबत नेमकं काय घडलं ?
सौरभ हत्याकांडाने मेरठ हादरलेलं असतानाच आता मुझफ्फरनगरमध्ये असाचा काहीसा भयानक प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. एक कप कॉफी प्यायल्याने एक इसम थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला. नेमकं काय घडलं ?

मेरठच्या सौरभ राजपूत प्रकरणानंतर, पत्नीने पतीला मारले किंवा जीवे मारण्याची धमकी दिली अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. आता असेच एक प्रकरण यूपीतील मुझफ्फरनगरमधून समोर आले आहे. तेथे एका पत्नीने पतीला कॉफीमधून विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. आता तो पती हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाच्या उंबरठ्यावर असून आयुष्यासाठी लढत आहे. तर याप्रकरणी नणंदेने तिच्या वहिनीची काळी कृत्य जगासमोर आणली आहेत.
पीडित इसमाच्या कुटुंबीयांनी सुनेविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पत्नीने कॉफीमध्ये विष मिसळून पतीला जीवे मारण्याच्या उद्देशाने ते पाजल्याचे सांगितले जात आहे. हे प्रकरण खतौली कोतवाली भागातील भयंगी गावातील आहे. 2 वर्षांपूर्वी 26 वर्षीय अनुज शर्माचा विवाह गाझियाबादच्या लोनी पोलीस स्टेशन परिसरातील फराखनगर येथील पिंकी शर्मा उर्फ सना हिच्याशी झाला होता. अनुज मेरठच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये काम करतो. पण लग्नाच्या काही महिन्यांनंतरच अनुज आणि पिंकी यांच्यात वाद सुरू झाला. पिंकी दुसऱ्या मुलाशी मोबाईलवर बोलायची, यावरून अनुज आणि पिंकीमध्ये अनेकदा भांडण होत होते, असा आरोप आहे.
नातेवाईकाशीच अफेअर असल्याचा आरोप
पिंकीचे लग्नापूर्वी दुसऱ्या मुलासोबत अफेअर होते असा आरोप अनुजची मोठी बहीण मीनाक्षीने केला आहे. लग्नानंतरही ती त्याच्याशी मोबाईलवर बोलायची. अनुजने पिंकीला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती सुधारली नाही. अनुज जेव्हा कामावर जायचा तेव्हा पिंकी त्या मुलाशी तासनतास बोलत राहायची. एके दिवशी अनुजने पिंकीचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यामध्ये त्याला मुलासोबतचे संभाषण आणि फोटो दिसले. मिळालेल्या माहितीनुसार, तो मुलगा पिंकीच्या मामाच्या मुलीचा मुलगा होता. त्यांचे अफेअर असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
कॉफीतून विष पाजण्याचा प्रयत्न
25 तारखेच्या संध्याकाळी पिंकीने कॉफीमध्ये विष मिसळले आणि अनुजला जीवे मारण्याच्या उद्देशाने ते प्यायला लावले असा आरोप अनुजच्या बहिणीने केला. ती कॉफी प्यायल्यामुळे अनुजती प्रकृती खालावली आणि त्याला मेरठ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पिंकीने अनुजला तिच्या मार्गातून दूर करण्याचा कट रचला असा आरोपही अनुजच्या बहिणीने केला. अनुजची मोठी बहीण मीनाक्षी हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पिंकीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.