हैदराबाद | 24 ऑगस्ट 2023 : ब्रिटनमध्ये फार्मासिस्ट म्हणून कार्यरत असणाऱ्या एका 45 वर्षीय व्यक्तीने कथितपणे जेवणात विष (poision) मिसळून त्याची पत्नी आणि तिच्या कुटुंबियांना संपवण्याचा कट (murder plan) आखला होता. त्याने त्यांच्या जेवणात आर्सेनिक मिसळले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
यामुळे पत्नीच्या कुटुंबातील सदस्य आजारी पडले आणि तिच्या आईचा (वय 60) उपचारांदरम्यान जून महिन्यात मृत्यू झाला, असेही पोलिस म्हणाले. घरगुती वादांमुळे पत्नीने घटस्फोटाची नोटीस पाठवल्यानंतर फार्मासिस्ट संतापला होता, त्याच भरात त्याने हा कट आखला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मियापूर पोलिस ठाण्यात आरोपीच्या पत्नीने तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत खून, खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मित्रांसह सहा जणांना जणांना 18 ऑगस्ट रोजी अटक केली. मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. तक्रारदार महिला आणि आरोपी यांच्यात वाद सुरू होते. 2018 मध्ये त्यांचा विवाह झाला. हे त्या दोघांचेही दुसरे लग्न होते.
लग्नानंतर ते दोघे एकत्र राहू लागले, पण काही दिवसानंतर आरोपीने पत्नीचा मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. नंतर तो ब्रिटनला परत निघून गेला आणि पत्नीलाही तेथे येण्यास सांगितले.
पत्नीचा करायचा छळ
त्याच्यावर विश्वास ठेवून पत्नी तिच्या लेकीसह ब्रिटनला गेली खरी, मात्र तेथे काही दिवसांनी आरोपीने तिचा मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरूवात केली. या घटनांनंतर महिलेने ब्रिटनमध्ये पतीपासून वेगळे राहण्यास सुरुवात केली आणि घर सोडल्यानंतर तिने पतीला घटस्फोटाची नोटीस पाठवली. महिलेच्या भावाचे लग्न ठरल्यानंतर ती जूनमध्ये हैदराबाद येथील तिच्या घरी आली, तेथे तिचे सर्व नातेवाईकही जमले होते. या लग्नात सहभागी होण्यासाठी तिचा नवराही हैदराबादला आला होता.
मात्र तेथे महिलेचे नातेवाईक जुलाब, उलटी आणि पोटदुखीमुळे त्रस्त झाले. महिलेच्या आईला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र जूनमध्ये त्यांचा मृत्यू झाला. तसेच तक्रारदार महिलेचे वडील, भाऊ, वहिनी यांनाही जुलै महिन्यात खूप त्रास झाला व त्यांनाही रुग्णालयात दाखल करावे लागले, असे पोलिसांनी सांगितले.
विषबाधा झाल्याची डॉक्टरांनी केली पुष्टी
अलीकडे, महिला आणि तिच्या मुलीला देखील जुलाब वगैरे त्रास होऊ लागला, त्यानंतर आई आणि मुलगी दोघेही उपचारासाठी आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील एका डॉक्टरकडे गेले असता त्यांना आर्सेनिकमुळे विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नंतर महिलेच्या घरी जेवण बनवणारे आणि तिच्या कुटुंबियांची तपासणी करण्यात आली असता त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात आर्सेनिक (विष) आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मित्रांद्वारे किचनमधील मसाल्यांत विष मिसळले
यामुळे महिलेला तिचे काही कुटुंबिय आणि इमारतीच्या सुरक्षारक्षकाच्या मुलावर संशय आला. त्यांची कसून चौकशी करण्यात आली असता त्या महिलेच्या पतीनेच (आरोपी) हत्येच्या इराद्याने हा कट रचल्याचे समोर आले. आरोपीने महिलेच्या कुटुंबातील सदस्याच्या मदतीने त्याच्या एका मित्राला घरी पाठवले आणि किचनमधील मीठ आणि लाल तिखटामध्ये आर्सेनिक मिसळण्यास सांगितले. हा प्रकार उघडकीस येताच महिलेने तिच्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली, मात्र तो पर्यंत तो ब्रिटनला परत गेला होता.