Pooja Khedkar : आई पकडली, बापाचीही कसून चौकशी सुरू, पूजा खेडकर यांचं काय होणार?; काय आहे प्रकरण?
IAS Pooja Khedkar : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा पाय आणखीनच खोलात जात असल्याचे दिसत आहे. पूजा यांच्या संदर्भातील वाद आणि नवनवी माहिती समोर येत असतानाच त्यांच्या कुटुंबियांचेही नवनवीन कारनामे उघड होत आहेत. पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांना नुकतीच अटक करण्यात आली. आणि आता एसीबीकडून पूजाचे वडील दिलीप यांचीही चौकशी करण्यात येणार आहे.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या मागच्या अडचणी काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. वरिष्ठांच्या केबिनवर ताबा मिळवणं, खासगी गाडीवर लाल दिवा वापरणं, कोट्यावधींची संपत्ती असताना ओबीसी कोट्यातून यूपीएससी परीक्षा पास होणं, दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे आयएएसपद मिळवणं, असे गंभीर आरोप पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आले आहेत. त्यासंदर्भात रोज नवनवे अपडेट्स समोर येत असतानाच त्यांच्या कटुंबियांचेही नवनवीन कारनामे उघड होत आहेत. शेतकऱ्यांना बंदूक दाखवून धमकावल्याप्रकरणी पूजाची आई मनोरमा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर आज त्यांना अटक करण्यात आली. तेवढ्यातच पूजाच्या वडिलांबद्दलही नवी माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची अहमदनगर एसीबीकडून ओपन चौकशी सुरू आहे.
काय आहे प्रकरण ?
पूजा खेडकर यांचे वडील, निवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर हेही आता अडचणीत सापडले आहेत. अहमदनगर एसीबीकडून त्यांची चौकशी सुरू आहे. बेहिशोबी मालमत्ते संदर्भात ही चौकशी होत आहे. २०१५ सालापसून पासून दिलीप खेडकर यांची नगर एसीबीकडे चौकशी सुरू होती. नोकरीत असताना त्यांनी स्रोत उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती कमावल्याच्या तक्रारीवरून एसीबीने दिलीप खेडकर यांची चौकशी सुरू केली होती. आता पूजा खेडकर प्रकरण उजेडात आल्यानंतर दिलीप खेडकर यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. त्यांच्या या चौकशीतून काय काय नवी माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोण आहेत दिलीप खेडकर ?
वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे निवृत्त सनदी अधिकारी आहेत. दिलीप खेडकर यांनी नुकतीच अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. वंचित बहुजन आघाडीकडून ते अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना 13 हजार 749 मतं मिळाली होती. निवडणुकीदरम्यान शपथपत्रात त्यांनी त्यांच्याकडे 40 कोटी रुपयांची संपत्ती आणि 43 लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न असल्याचे नमूद केले होते. तसेच 110 एकर जमीन, 7 फ्लॅट्स असल्याचेही दाखवले होते. त्यापैकी एक पवई हिरानंदानीमध्ये आहे. 1 लाख 60 हजार स्केअर फूटची 6 दुकाने आहेत, असंही त्यांनी नमूद केलं होतं. मात्र एका निवृत्त अधिकाऱ्याकडे एवढी संपत्ती कशी असा प्रश्न उपस्थित झाला होता.
दिलीप खेडकर यांच्यावर याआधीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. यासाठी त्यांचे निलंबनही झाले होते. मुळचे पाथर्डीमधील भालगाव असणार दिलीप खेडकर यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलंय. आता याच बेहिशोबी मालमत्तेसंबंधी त्यांची एसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे.
आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप
दरम्यान आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी आणखी एका मुद्दा उपस्थित करत पूजा खेडकर यांच्यावर आरोप केली आहे. ‘ हा काही विनोद आहे का? पुजा खेडकर यांनी 23/08/2022 रोजी अपंगत्व प्रमाणपत्रासाठी औंध सिव्हिल हॉस्पिटल आणि वायसीएम हॉस्पिटलमध्ये अपघाताचे कारण देत दोन स्वतंत्र अर्ज केले. तिने दावा केला की ससून हॉस्पिटलने तिच्यावर औंध आणि वायसीएम पिंपरी चिंचवड, वायसीएममध्येच उपचार केले. फ्रॉड डॉक्टरांनी तिला २४ तासांत प्रमाणपत्र दिले. तरीही त्यांच्यावर कारवाई नाही. किती सडलेली व्यवस्था आहे !’ असे लिहीत विजय यांनी टीका केली आहे.