अंबरनाथमध्ये आंबे विक्रेत्याला ३० हजारांचा गंडा, ४० डझन घेतल्यानंतर दिलेला चेक…
४० डझन आंबे घेत दिलेला चेक झाला बाउन्स झाला आहे. भामट्या गिऱ्हाईकाचा फोन देखील स्विच ऑफ येत आहे. आंबे विक्रेत्याकडून पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर...
निनाद करमरकर, अंबरनाथ : अंबरनाथमध्ये (Ambernath) एका आंबे विक्रेत्याला (mango seller) भामट्याने तब्बल ३० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या भामट्याने आंबे विक्रेत्याकडून ४० डझन आंबे खरेदी करत ३० हजारांचा दिलेला चेक बाउन्स झाल्याने आंबे विक्रेता मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे विक्रेत्याने पोलिस स्टेशन गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला आहे. पोलिसांनी (ambernath police) त्या भागातले सीसीटिव्ही तपासणीसाठी घेतले आहेत. अशा पद्धतीने कुणावरही विश्वास ठेऊ नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
मोठी ऑर्डर असल्यामुळे…
अंबरनाथ पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना शहर शाखेच्या बाजूला गंगाराम बोऱ्हाडे हे मागील अनेक वर्षांपासून आंबे विक्रीचा व्यवसाय करतात. बोऱ्हाडे यांच्याकडे ३ मे रोजी एक भामटा आला, त्याने आपल्याला एका ट्रस्टला देण्यासाठी ४० डझन आंबे हवे असल्याचं सांगितलं. मोठी ऑर्डर असल्याने बोऱ्हाडे यांनीही त्याला ४० डझन आंबे देऊ केले. त्याबदल्यात या भामट्याने बोऱ्हाडे यांना ३० हजार रुपयांचा चेक दिला.
फोन देखील स्विच ऑफ झाला
बँक ऑफ बडोदा ठाणे पश्चिम शाखेच्या या चेकवर गोकुळदास क्रिशनदास आढिया हे नाव आहे. हा चेक बोऱ्हाडे यांनी दुसऱ्या दिवशी त्यांच्या बँकेत टाकला. मात्र आठवडाभराने हा चेक बाउन्स झाल्याचं त्यांना त्यांच्या बँकेतून सांगण्यात आलं. कारण चेक देणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात तितकी रक्कमच नव्हती. त्यामुळे बोऱ्हाडे यांनी या गिऱ्हाईकाला फोन केला असता. त्याचा फोन देखील स्विच ऑफ झाला आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येतात गंगाराम बोऱ्हाडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबतची तक्रार दिली.
सीसीटिव्हीचा आधार घेऊन आरोपीची…
याप्रकरणी आता पोलिसांकडून या भामट्या गिऱ्हाईकाचा शोध घेतला जातोय. मात्र या घटनेमुळे कुणावरही अंधपणे विश्वास ठेवू नये, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. पोलिसांनी सीसीटिव्हीचा आधार घेऊन आरोपीची शोधाशोध सुरु केली आहे.