दहावीत प्रेम करणे महागात पडले, 25 फेब्रुवारीपासून बेपत्ता होता, मग थेट…
वर्गमैत्रिणीसोबत प्रेम करणे एका मुलाला महागात पडले आहे. प्रेमप्रकरणाच्या रागातून मुलीच्या घरच्यांनी मुलाची हत्या करुन मृतदेह शेतात फेकला. याप्रकरणी मुलीच्या घरच्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
औरंगाबाद / दत्ता कनवटे : प्रेमप्रकरणातून मुलीच्या नातेवाईकांनी दहावीत शिकणाऱ्या मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना वैजापूर तालुक्यातील भिवगाव येथे घडली आहे. मंगळवारी सकाळी मुलाच्या हत्येची बाब उघडकीस आली. मयत मुलगा हा 25 फेब्रुवारी पहाटेपासून घरातून बेपत्ता होता. त्याचे अपहरण झाल्याची तक्रार त्याचे वडील प्रभाकर नारायण काळे यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात दिली होती. मयत मुलगा हा विनायक नगर येथील शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. दादासाहेब माधवराव जंगले, सुनील माधवराव जंगले, माधवराव कारभारी जंगले अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
मुलाचे वर्गातील मुलीसोबत प्रेमसंबंध होते
मुलाचे वर्गातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यांचे प्रेमप्रकरण परिसरात अनेक जणांना माहीत होते. त्याने सदर मुलीला मोबाईल देखील घेऊन दिला होता. या मोबाईलवरुन ते एकमेकांच्या संपर्कात राहत होते. चार दिवसापासून बेपत्ता मुलाचा शोध सुरु होता. मात्र त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. अखेर मंगळवारी सकाळी कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेहच आढळला.
शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
वैजापूर तालुक्यातील भिवगाव भास्कर माधव गायके यांच्या शेतातील गहू पिकाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत मुलाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह अपहरण झालेल्या मुलाचा असल्याची खात्री पटली. हा मृतदेह मुलीच्या घरापासून हाकेच्या अंतरावर पडलेला होता. मृतदेहावर पोलिसांना काही जखमाही आढळून आल्या आहेत.
हत्येप्रकरणी चौघे ताब्यात
घटनेची माहिती मिळताच पोलीस उप अधिक्षक महक स्वामी यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, मोईस बेग, राम कवडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणात मुलीचे आई-वडील, आजोबा आणि काका या चार जणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.