व्हिडिओ कॉलवर पत्नीशी बोलत होता, तेवढ्यात मित्र आला अन् म्हणाला मलाही बघायचं आहे; मग…
मित्राने अशा प्रकारे आपला अपमान केला, याचा राग मनात धरून सुरेशने थेट कात्री हातात घेऊन मित्रावर जीवघेणा हल्ला केला. यात राजेश जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बंगळुरु : प्रेमप्रकरण आणि विवाहबाह्य संबंधातून हत्या तसेच हत्येचा प्रयत्न करण्याचे प्रकार वाढले आहेत. याचदरम्यान कर्नाटकमध्ये व्हाट्सअप व्हिडिओ कॉलिंगवरून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. एका 56 वर्षीय व्यक्तीने त्याच्या मित्रावर कात्रीच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला केला. मित्र व्हाट्सअप व्हिडिओ कॉलिंग करून आपल्या पत्नीशी बोलत होता. तितक्यात तेथे आरोपी आला आणि त्याने मित्राला त्याच्या पत्नीचा चेहरा दाखवण्यास सांगितले. मात्र मित्राने आपल्या पत्नीसोबत बोलण्यास मनाई केल्यामुळे संतापलेल्या 56 वर्षीय आरोपीने त्याच्यावर कात्रीने वार केले. कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगलोर शहरात ही खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात; खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा
मित्रावर हल्ला करणारा आरोपी आणि हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीची ओळख पटली आहे. आरोपीचे नाव सुरेश व्ही असून, त्याने त्याचा मित्र राजेश मिश्रावर कात्रीने वार केला. सुरेशने राजेशला त्याच्या पत्नीचा व्हाट्सअप कॉलिंगवर चेहरा दाखवण्यास सांगितले. मात्र राजेशने त्याची ही मागणी तडक धुडकावून लावली.
मित्रावर जीवघेणा हल्ला
मित्राने अशा प्रकारे आपला अपमान केला, याचा राग मनात धरून सुरेशने थेट कात्री हातात घेऊन मित्रावर जीवघेणा हल्ला केला. यात राजेश जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक पोलिसांनी आरोपी सुरेशला अटक केली आहे त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडीत आणि आरोपी सेल्समन म्हणून काम करतात
सुरेश एचएसआर लेआउट परिसरातील रहिवासी आहे तर राजेश हा कोरमंगलाच्या जवळील वेंकटपुरा परिसरात राहतो. दोघे एचएसआर लेआउट सेक्टर-2 येथील एका दुकानात सेल्समन म्हणून काम करतात.
राजेश मिश्राने सोमवारी आपल्या पत्नीला व्हिडिओ कॉल केला होता. त्यावेळी तेथे सुरेश गेला आणि त्याने राजेशला पत्नीचा चेहरा दाखवण्यास सांगितले होते. यावेळी दोघांमध्ये वादावादी झाले आणि त्याचे पर्यवसान प्राणघातक हल्ल्यामध्ये झाले.