भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये काळिज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एका 13 वर्षीय मुलीच्या मृत्यूनंतर उद्भवलेली परिस्थिती सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. एकीकडे रुग्णालयातील सुविधांच्या अभावाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुलीचा मृतदेह घरापर्यंत नेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे हतबल झालेल्या मुलीच्या बापाने मृतदेह थेट दुचाकीवरून नेण्याची धमक दाखवली. बापाने जवळपास 50 किमी अंतरापर्यंत मुलीचा मृतदेह दुचाकीवरून नेला. शहडोल येथील सरकारी रुग्णालयाच्या भावनाशून्य कारभारामुळे अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाची परवड झाल्याने रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मुलीच्या अंतिम प्रवासात आलेली ही दुर्दैवी वेळ, अशा परिस्थितीत मुलीच्या बापाने दाखवलेली हिम्मत आणि याचदरम्यान महिला जिल्हाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपून मदतीचा हात पुढे करत प्रशासनाला दिलेला आदेश, यामुळे या घटनेबाबत सोशल मीडियातही संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
शहडोल येथील सरकारी रुग्णालयाच्या आडमुठ्या धोरणामुळे अल्पवयीन मुलीचा मृतदेह काही तास रुग्णालयातच ठेवावा लागला होता. रुग्णालय प्रशासनाने शहडोलपासून 15 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर ॲम्बुलन्स सेवा देत नसल्याचे स्पष्टीकरण मुलीच्या बापाला दिले. मुलीचे प्राण वाचवण्यात अपयशी ठरलेल्या रुग्णालयाच्या या आडमुठ्या कारभारामुळे मुलीचा बाप लक्ष्मण सिंह यांनी पर्यायी वाहनाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला.
रुग्णालय प्रशासनाच्या सूचनेवरून त्यांनी पर्यायी वाहनाची शोधाशोध केली. मात्र 70 किलोमीटर अंतरावरील गावामध्ये ॲम्बुलन्स नेण्याचे भाडे लक्ष्मण सिंह यांच्या आवाक्याबाहेर होते. परिस्थिती बेताची असल्यामुळे हतबल झालेल्या लक्ष्मण सिंह यांनी अखेर स्वतःच्याच दुचाकीवरून मृतदेह नेण्याचा निश्चय केला. कोटा गाव येथील रहिवासी लक्ष्मण सिंह यांची मुलगी माधुरी हिचा सिकल सेल ॲनिमिया आजाराने सोमवारी रात्री मृत्यू झाला. ती शहडोलच्या सरकारी रुग्णालयात दाखल होती.
लक्ष्मण सिंह हे दुचाकीवरून मुलगी माधुरीचा मृतदेह घेऊन जात असल्याचे मार्गातून चाललेल्या महिला जिल्हाधिकारी वंदना वैद्य यांना दिसले. त्यांनी तातडीने लक्ष्मण यांची दुचाकी थांबवली आणि मुलीचा मृतदेह गावापर्यंत नेण्यासाठी पर्यायी वाहन उपलब्ध करून देण्याचा आदेश स्थानिक प्रशासनाला दिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर वाहन उपलब्ध झाले आणि लक्ष्मण सिंह यांनी त्या वाहनातून मुलीचा मृतदेह घरी नेला. मग मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी शहडोलच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुलीच्या कुटुंबीयांना योग्य ती आर्थिक मदत देण्याचे तसेच घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.