कर्जबाजारीपणातून कुटुंबाने उचलले टोकाचे पाऊल; पाच जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक
केदारलाल गुप्ता यांचे शहरातील विजय बाजारमध्ये फळांचे दुकान होते. गुप्ता यांच्यावर खूप कर्ज होते. हे कर्ज परत करण्यासाठी कर्जदारांनी त्यांच्याकडे वारंवार तगादा लावला होता.
पटना : कर्जबाजारीपणातून एका कुटुंबाने विष प्राशन केल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. या घटनेत कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. एकाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचारा सुरु आहेत. बिहारमधील नवादा नगर पोलीस ठाण्याअंतर्गत न्यू एरिया मोहल्ला येथे एका फळविक्रेत्याने आपल्या कुटुंबासह आत्महत्या केली. फळविक्रेते असलेल्या केदारलाल गुप्ता यांच्या 10 ते 12 लाखांचे कर्ज होते. यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
विजय बाजारात फळांचे दुकान होते
केदारलाल गुप्ता यांचे शहरातील विजय बाजारमध्ये फळांचे दुकान होते. गुप्ता यांच्यावर खूप कर्ज होते. हे कर्ज परत करण्यासाठी कर्जदारांनी त्यांच्याकडे वारंवार तगादा लावला होता. मात्र गुप्ता हे कर्ज फेडू शकत नव्हते. कर्जामुळे त्यांचा खूप छळ होत होता.
कर्जबाजारीपणातून केले विष प्राशन
कर्जबाजारीपणातून बुधवारी रात्री उशिरा गुप्ता यांनी पत्नी आणि चार मुलांसह विष प्राशन केले. या घटनेत कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला. तर एका मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतांमध्ये कुटुंबप्रमुख केदार लाल गुप्ता, पत्नी अनिता कुमारी आणि तीन मुले प्रिन्स कुमार, शबनम कुमारी आणि गुडिया कुमारी यांचा समावेश आहे, तर मुलगी साक्षीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुलीला प्रथम पवापुरी विन्स येथे रेफर करण्यात आले होते. मात्र नंतर नवाडा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथेही गंभीर स्थिती पाहता साक्षीला आता पाटणा येथे रेफर करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी केदारलाल जिवंत होते. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता कर्जबाजारीपणातून विष प्राशन केल्याचे सांगितले. यानंतर केदारलाल यांना रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
विष प्राशन करण्यापूर्वी मुलाने बनवला व्हिडिओ
केदारलाल गुप्ता यांचा मुलगा प्रिन्सने विष प्राशन करण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओमध्ये प्रिन्सने म्हटले आहे की, बाजारातून काही लोकांकडून कर्ज घेतले होते आणि ते आम्हाला खूप त्रास देत होते.
आम्ही पैसे परत करण्यासाठी थोडा वेळ मागितला. पण लोक ते मानायला तयार नव्हते आणि वारंवार धमक्या देत होते. यामुळे सर्वांनी विष प्राशन केले.
तेव्हा साक्षीने सांगितले की, पापा डिप्रेशनमध्ये चालले होते, त्यांनी कर्ज घेतले होते. आम्हाला माहित नव्हते कर्ज कोणाकडून घेतले? या प्रश्नाच्या उत्तरात साक्षीने मनीष भैय्याचे नाव घेतले. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.