फेसबुकवर प्रेम, धर्म बदलून केला विवाह; मात्र ‘सोशल’ प्रेमाचा असा झाला अंत
छत्तीसगडमधील आरती नाग हिची फेसबुकद्वारे मोहम्मदपूर गावातील रहिवासी सोनू आलम याच्याशी मैत्री झाली. यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरु झाले. मग हळूहळू मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.
बिहार : बिहारमध्ये कौटुंबिक अत्याचाराला (Domestic Violence) कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या (Woman Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरती आलम असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. बिहारमधील पूर्णिया (Purnia bihar) येथे ही घटना घडली आहे.
फेसबुकवर मैत्री आणि मग प्रेम
छत्तीसगडमधील आरती नाग हिची फेसबुकद्वारे मोहम्मदपूर गावातील रहिवासी सोनू आलम याच्याशी मैत्री झाली. यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरु झाले. मग हळूहळू मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. सोनू हा मुस्लिम धर्मिय आहे तर आरती हिंदू धर्मीय.
धर्म बदलून प्रियकराशी विवाह केला
सोनूच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या आरतीने धर्म बदलून इस्लाम स्वीकारला आणि दोघांनी पळून जाऊन विवाह केला. लग्नानंतर सोनू आरतीला आपल्या मूळ गावी घेऊन आला. मात्र लग्नानंतर काही दिवसातच सोनू आणि त्याच्या कुटुंबीयांनी आरतीला त्रास देणे सुरु केले.
सासरच्यांकडून मानसिक आणि शारीरिक छळ
आरतीने याबाबत पंचायतीकडेही मदत मागितली होती. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. सासरच्यांकडून तिला मानसिक आणि शारीरिक छळ सुरुच होता. अखेर या जाचाला कंटाळून आरतीने आपले जीवन संपवले.
आरतीच्या मृत्यूप्रकरणी तिच्या नातेवाईकांनी सासरच्यांवर हत्येचा आरोप केला आहे. मात्र सासरच्यांनी आरतीने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. स्थानिक पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे.