संशयाचा कीडा मनात घुसला अन् क्षणात तिचा घात झाला, महिलेसोबत नेमके काय घडले?
पती-पत्नीचा सुखाचा संसार सुरु होता. पण अचानक पतीच्या मनात संशयाचा कीडा घुसला. या संशयाने त्यांचं आयुष्यचं उद्धवस्त झालं. त्याने जे केलं ते फारच भयंकर होतं.
धमतरी : वैवाहिक आयुष्यात ‘नांदा सौख्यभरे’ हे सुवचन कालबाह्य होत चालल्याचे दिवसेंदिवस घडणाऱ्या घटनांवरून स्पष्ट होत आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन टोकाचे पाऊल उचलण्याचे प्रकार घडत आहेत. अशाच प्रकारची धक्कादायक घटना रायपूर परिसरात घडली आहे. छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात एका निर्दयी पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि बेदम मारहाण करीत तिचा जीव घेतला. पतीने सतत काही वेळ जीवघेणी मारहाण सुरू ठेवली. त्यात गंभीर वेदना सहन करणाऱ्या पत्नीचा काही वेळानंतर दुर्दैवी अंत झाला. महिलेच्या मृत्यूप्रकरणी धमतरी जिल्ह्यातील बोराई पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. या घटनेने धमतरी जिल्ह्यासह संपूर्ण रायपुरमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी तातडीने घेतली घटनास्थळी धाव
पतीने केलेल्या बेदम मारहाणीमध्ये पत्नी वेदना असह्य झाल्यामुळे जोरजोराने ओरडत होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. मात्र तिला वाचवता आले नाही. महिलेचा बेदम मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचे कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर स्थानिक रहिवाशांचे जबाब नोंदवून घेत आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले. सुखचंद नेताम असे आरोपीचे नाव असून, त्याने पत्नी सुनीताला मारहाण केली. त्या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. लिखमा कमारपारा गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
महिलेच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या खुणा
घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलिसांना महिलेच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. आरोपी सुखचंद याने सुनिताला बेदम मारहाण केल्याचे यावरून पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच आधारे घटनास्थळी पंचनामा करून नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आरोपी सुखचंद याच्याविरुद्ध हत्या तसेच पलायन केल्याप्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पत्नीला बेदम मारहाण करून तिचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी सुखचंद याने घटनास्थळावरून पळ काढला होता. नंतर पोलिसांनी गावामध्ये गोपनीय कारवाई करत आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळवले.
आरोपी सुखचंद याने पत्नी सुनीता हिला काठी तसेच पट्ट्याने बेदम मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे. अटकेच्या कारवाईनंतर सुखचंद याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.