नवी दिल्ली : काँग्रेस नेते, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सर्वोच्च न्यायालया (Supreme Court)ने तात्पुरता दिलासा दिला आहे. त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी (Hearing) न्यायालयाने पुढे ढकलली आहे. त्यांनी 6 मार्च 2014 रोजी महाराष्ट्रातील भिवंडीमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान भाषण केले होते. त्या भाषणामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) लोकांनीच महात्मा गांधी यांची हत्या केली होती, असे खळबळजनक विधान केले होते. त्या विधानावरून त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला.
याचिकाकर्त्याने यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यावेळी त्याने राहुल गांधींच्या भाषणाची ट्रान्सक्रिप्ट पुराव्याच्या रुपात विचारात घेण्याची विनंती केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याची ही विनंती धुडकावून लावली होती. उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाला याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणी न्यायालयाने गुरुवारी पुढे ढकलली. याप्रकरणी आता 8 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे राहुल गांधींना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
सप्टेंबर 2018 मध्ये भिवंडी दंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आव्हान देत कुंटे यांनी 2019 मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. असे आरोपपत्र पुरावा म्हणून स्वीकारण्याची विनंती दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या एकल खंडपीठाने कुंटे यांची याचिका फेटाळून लावली. या भाषणावरून कुंटे यांनी 2014 मध्ये राहुल गांधी यांच्यावर फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता.
कुंटे यांच्या याचिकेनुसार, गांधींनी 6 मार्च 2014 रोजी भिवंडीतील निवडणूक रॅलीत भाषण केले होते. तेथे त्यांनी कथितपणे म्हटले होते की, महात्मा गांधींची हत्या आरएसएसच्या लोकांनी केली होती. यानंतर संघाच्या भिवंडी विभागाचे सचिव कुंटे यांनी राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल केला. तर त्यांचे वक्तव्य कट करुन दाखवण्यात आल्याचे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
डिसेंबर 2014 मध्ये राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांच्याविरुद्ध सुरू केलेल्या मानहानीच्या कारवाईला आव्हान दिले होते. या भाषणाची प्रत त्यांनी त्यावेळी उच्च न्यायालयात सादर केली होती. कुंटे यांनी उच्च न्यायालयातील त्यांच्या याचिकेत म्हटले होते की, राहुल गांधी यांनी त्यांचे भाषण कुठेही नाकारले नाही आणि त्यांनी केवळ त्यांच्या बचावात केवळ भाषणावेळी असलेली परिस्थिती स्पष्ट केली आहे. (In defamation case rahul gandhi supreme court big console)