शाळेत 10 मिनिटे उशिरा पोहचला, शिक्षकाने केले असे की काही विद्यार्थी थेट व्हेंटिलेटरवर
गंभीर अवस्थेत विद्यार्थ्याला दिल्लीतील होली फॅमिली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी शाळेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फरीदाबाद : शाळेत 10 मिनिटे उशिरा पोहचला म्हणून बारावीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केल्यामुळे मुलाची प्रकृती गंभीर असल्याची संतापजनक घटना फरीदाबाद घडली आहे. गंभीर अवस्थेत विद्यार्थ्याला दिल्लीतील होली फॅमिली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी शाळेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फरीदाबादमधील डीपीएस सेक्टर 11 स्कूलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
पीडित मुलगा बारावीचा विद्यार्थी
अपूर्वा सिंह असे जखमी विद्यार्थ्याचे नाव असून तो डीपीएस स्कूलमध्ये इयत्ता बारावीत शिकतो. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी अपूर्वा शाळेत 10 मिनिटे उशिरा पोहचला. यामुळे चिडलेल्या शिक्षकाने त्याला बेदम मारहाण केली.
माराहाणीनंतर मुलाची प्रकृती बिघडली
मारहाणीनंतर अपूर्वाची तब्येत खालावत गेली. त्यानंतर मुलाची प्रकृती गंभीर झाली. लोकेश असे मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. लोकेश आणि शाळा व्यवस्थापनामुळे आपल्या मुलाच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे मुलाच्या नातेवाईकांनी सांगितले.
नातेवाईक शाळेत विचारणा करायला गेले तेव्हा लोकेशनेही मारहाणीची घटना कबुल केली. लोकेशने नातेवाईकांना सांगितले की, त्यांचा मुलगा अभ्यासात कमकुवत आहे, म्हणून त्याला मारले. मुलाने मारहाणीबाबत आपल्या भावालाही सांगितले होते.
आरोपी शिक्षक आणि शाळेविरोधात कारवाईची मागणी
नातेवाईकांनी डीपीएस सेक्टर 11 शाळेची मान्यता रद्द करण्याची आणि आरोपी शिक्षकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शाळेचे मुख्याध्यापक मनिष वाधवा यांनी आपण पीडिताच्या सोबत असल्याचे सांगितले.
आरोपी शिक्षक निलंबित
या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत आरोपी शिक्षक लोकेशला निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांनी मुलासोबत झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाचा पूर्णपणे इन्कार केला आहे.