कमालच झाली, चोरट्यांनी घरातील तेल-तुप, बादलीलाही सोडलं नाही, पोलिसही मुद्देमाल पाहून चक्रावले
पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अशा टोळीला पकडले आहे जे घरातील भांडीकुंडीही सोडत नाहीत. त्यांनी घरातील एकही वस्तू सोडली नाही.
लखनऊ | 10 ऑगस्ट 2023 : वाढत्या महागाईची झळ चोरट्यांनाही बसू लागली आहे. दिल्ली – एनसीआरला लागून असलेल्या गाजियाबाद येथे अजब चोरीचे प्रकरण उघडकीस आले आहे. येथील चोरांनी केलेली चोरी पाहून पोलिसांनी देखील कपाळाला हात लावला आहे. चोर शक्यतो महागड्या वस्तू जसे सोने नाणे दागिने आणि रोकड चोरत असतात असा आजवरचा समज होता. परंतू येथे एका घरफोडीत चोरांना दैनंदिन वापराच्या वस्तू चोरल्याने सर्वच जण हैराण झाले आहेत. चोरट्यांनी चक्क तेल, तूप, एलपीजी गॅसचा सिलेंडर आणि सिलींग फॅन देखील चोरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गेल्याकाही दिवसात गाजियाबादच्या विविध भागात घरफोडीच्या अनेक घटना घडल्याने पोलिसांवर प्रेशर वाढले होते. यानंतर वेगवेगळी पोलिस पथके कार्यरत झाली. अशा मोहिमेत एका गॅंगचा प्रमुख मुखलाल याला अटक करण्यात यश आले. गाजियाबाद पोलिसांनी केलेल्या चौकशीत मुखलाल याच्या विरोधात पश्चिम उत्तर प्रदेशात लूटमारी आणि चोरीचे एकूण 42 गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले.
चोरांनी चोरीचे स्टाईल बदलली
गाजियाबादचे शहर डीसीपी निपुण अग्रवाल यांनी सांगितले की 29 जुलै रोजी गढी गावातील निवासी सौरभ यांनी नंदग्राम येथे चोरी झाल्याची तक्रार नोंदविली. सौरभ याने सांगितले की तो कुटुंबासह बाहेरगावी असताना त्याच्या घरात चोरी झाली. ते बाहेरगावाहून परतले तर घरी खाली झाले होते. चोरांनी घरातील दागिने आणि पैसे तर चोरलेच शिवाय घरातील सगळे सामानच खाली केले. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या मदतीने तीन चोर आणि एका सोनाराला अटक केली.
फुटकळ सामानही सोडले नाही
हे पाच चोर मिळून रिकाम्या घरांची रेकी करायचे. दिवसा टेहळणी करून रात्री दरोडा टाकायचे. घरातील सामान चोरुन ते भंगार वाले आणि दागिने सोनाराला विकायचे अशी माहीती उघडीस आली आहे. या टोळीचा म्होरका मुखलाल याने साल 2020 मध्ये दिल्लीतील मनीषा सिंघल याच्या घरातून 75 लाखांचे दागिने चोरले होते. या प्रकरणी त्याला अटक झाली होती आणि चोरीचे सामान जमीनीतून हस्तगत केले होते. या चोरट्याने सौरभ याच्या घरातून इन्व्हर्टर, एसी स्टॅबिलाझर, दोन एलईडी टीव्ही, इस्री, पाण्याचा मिल्टनचा जग, कढई, स्टीलच्या वाट्या ग्लास, प्लेट चहाची किटली, गॅस सिलेंडर, पंखे, खाद्य तेलाचे डबे, बॅटरी आणि दागिने चोरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.