पतीचा दुसरीवर जीव जडला, मात्र पत्नीने विरोध दर्शवला; सासरवाडीला जाण्याच्या बहाण्याने नेले अन्…
आपल्यासोबत लुटमारीची घटना घडली असून, चोरट्यांनी पत्नीची हत्या केल्याचा बनाव केला. मात्र पोलीस चौकशीत पतीचा बनाव उघडकीस आला.
गाझियाबाद : अनैतिक संबंधाला विरोध करत असल्याने प्रेयसीच्या मदतीने पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना गाझियाबाद येथे घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर तीन तास मृतदेह गाडीत घेऊन फिरला. त्यानंतर आपल्यासोबत लुटमारीची घटना घडली असून, चोरट्यांनी पत्नीची हत्या केल्याचा बनाव केला. मात्र पोलीस चौकशीत पतीचा बनाव उघडकीस आला. पोलिसांनी पतीसह त्याच्या प्रेयसीला अटक केली आहे. विकास आणि अनिषा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
काय आहे प्रकरण?
गाझियाबादमधील मोदीनगर परिसरात आनंद विहार येथे विकास आणि त्याची पत्नी सोनिया राहत होते. विकास हरियाणातील भिवाडी येथे एका औषध कंपनीत काम करत होता. तेथेच त्याची भेट अनिषाशी झाली.
दोन वर्षे विकास आणि अनिषा यांच्यात अनैतिक प्रेमसंबंध सुरु होते. मात्र पत्नी सोनियाला या संबंधाबाबत कळल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद होऊ लागले. सोनियाचा पतीच्या अनैतिक संबंधाला विरोध होता.
यातूनच विकासने पत्नीचा काटा काढण्याचे ठरवले. प्लाननुसार त्याने शुक्रवारी पत्नीला तिच्या माहेरी जायचे आहे सांगत गाडीत बसवले. त्यानंतर गाझियाबादला पोहचल्यानंतर तेथे प्रेयसीलाही गाडीत बसवले.
हत्या करुन लुटमार झाल्याचा बनाव केला
हायवे वर गाडी येताच पत्नीची गळा आवळून त्याने हत्या केली. यानंतर विकास आणि अनिषा तीन तास मृतदेह गाडीत घेऊन फिरत होते. यानंतर विकास पोलिसांकडे गेला आणि आपल्यासोबत लुटमारीची घटना झाली असून, यात चोरांनी आपल्या पत्नीला मारुन टाकल्याचा बनाव केला.
‘असा’ झाला गुन्हा उघड
पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला असता पोलिसांना विकासवर संशय आला. पोलिसांनी विकासचा मोबाईल तपासला. यावेळी गूगलवर त्याने हत्या कशी करायची? हे सर्च केल्याचे दिसले. तसेच ऑनलाईन विष खरेदी करण्याचा आणि बंदुक कुठे मिळेल हे सर्च केल्याचेही आढळून आले.
पोलिसांनी विकासची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. यानंतर पोलिसांनी विकास आणि अनिषाला अटक केली आहे. या हत्याकांडात आणखी काही लोकांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.