विवाहित महिला अचानक गायब झाली, अवकाळी पाऊस आला अन् महिलेचा थांगपत्ता लागला; काय आहे प्रकरण?
एक महिला अचानक घरातून गायब झाली. तिचे माहेरचे तिला सर्वत्र शोधत होते. मात्र तिचा कुठेही शोध लागला नाही. मात्र अचनाक अवकाळी पाऊस झाला. हा पाऊस नागरिकांसाठी त्रासदायक असला तरी याच पावसामुळे एका हत्येचे गूढ उकलण्यास मदत झाली.
ग्रेटर नोएडा : दिल्ली एनसीआरच्या ग्रेटर नोएडामध्ये हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. पडीक जमिनीत एका महिलेचा मृतदेह पुरलेला आढळून आला. कुत्रे मृतदेहाचे लचके तोडताना स्थानिकांना दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मयत महिलेच्या भावाने आपली बहिण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करत 15 दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नरेंद्रने आपल्या बहिणीच्या सासरच्यांनी हुंड्यासाठी तिची हत्या केल्याचे म्हटले होते. नरेंद्रच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
पावसामुळे माती वाहून गेली अन्…
दरम्यान, महिलेचा मृतदेह ग्रेटर नोएडाच्या सेक्टर-155 मध्ये एका पडीक जमिनीत पुरलेला आढळून आला. दिल्ली एनसीआरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवामान खराब आहे. त्यामुळे वादळासह मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे मृतदेह पुरल्यानंतर खड्ड्यात पुरलेली माती वाहून गेली. त्यामुळे मृतदेहाच्या दुर्गंधीमुळे कुत्रे तेथे पोहोचले आणि मृतदेहाचे लचके तोडू लागले.
स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली
स्थानिक नागरिकांनी ही बाब पाहिल्यानंतर त्यांनी नॉलेज पार्क पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला. घटनास्थळी तपासासाठी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले. फॉरेन्सिक टीमने तपास केल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. घटना उघड होताच सासरचे लोक फरार झाले आहेत. त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
सासरचे लोक हुंड्यासाठी छळायचे
महिलेच्या भावाने एफआयआरमध्ये सांगितले होते की, त्याच्या बहिणीचा सासरचे लोक हुंड्यासाठी तिचा छळ करत होते. सुमारे सात वर्षांपूर्वी 2015 मध्ये सरिता हिचे लग्न जोगिंदर नावाच्या तरुणाशी झाले. लग्नात सुमारे 10 लाख रुपये खर्च केला होता. लग्नात जोगिंदरला बाईकही देण्यात आली होती. मात्र लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या लोकांनी बहिणीचा हुंड्यासाठी छळ सुरू केला.
याप्रकरणी 2021 मध्ये पोलिसांकडे तक्रारही केली होती. परंतु कुटुंबातील वडीलधारी मंडळी आणि पोलिसांनी तडजोड केली. सरिताचा भाऊ 8 मार्च रोजी तिला फोन काम करत होता. पण तिचा फोन बंद येत होता. यामुळे तिचा भाऊ तिच्या सासरच्या घरी तिला भेटायला आला. यावेळी तिच्या जावेने सांगितले की, ती पळून गेली. यानंतर हत्येची भीती व्यक्त करत भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.